मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी केली परीक्षाच मॅनेज; औरंगाबादमध्ये एमबीएचा प्रथम सत्राचा पेपर फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 01:26 PM2018-01-01T13:26:36+5:302018-01-01T13:29:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच 'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर आला होता.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीएमच्या प्रथम सत्राचा पेपर आज सकाळी सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात फुटला. पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच 'अकौटिंग फॉर मॅनेजर' हा पेपर परीक्षार्थींच्या मोबाईलवर आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २६ डिसेंबरपासून एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. आज 'अकौटिंग फॉर मॅनेजर' या विषयाचा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सुरु होता. यावेळी देवगिरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा केंद्रावर होता. दहा वाजता पेपर सुरु झाला असता परीक्षा केंद्राच्या आवारात असलेल्या दोघाजणांच्या मोबाईलवर अवघ्या सहा मिनिटातच पेपरचा स्नॅप आला.'फ्युचर मॅनेजर' या ग्रुपवर पेपरचा स्नॅप आल्यानंतर ही दोघे झाडाखाली बसून उत्तर लिहित होती.
या दरम्यान १० वाजून १२ मिनिटाला महाविद्यालयाचे शिपाई सतीश पवार, हनुमंत कोरडे, रवी गवळी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तेव्हा त्यांनी तत्काळ द्या विद्यार्थ्यांना पकडले. अधिक चोकशी करत शिपायांनी पेपरचा स्नॅप ज्या विद्यायार्थ्यानी पाठवला होता त्याचा डीपी पाहून केंद्रातील परीक्षार्थी विद्यार्थ्यास पकडले. हॉल नंबर ६ मध्ये सापडलेल्या या परीक्षार्थीने तत्काळ हॉल तिकीट फाडून टाकले. त्यानंतर पकडलेल्या तिघांना शिपायांनी प्राचार्यांच्या समोर हजर करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव डॉ. प्रताप कुलावंत, प्राचार्य मजहर फारुखी यांनी घटनास्थळी भेट दिली. आजचा पेपर विद्यापीठाकडून रद्द करण्यात आला आहे. पेपर फुटीची माहिती मिळताच महाविद्यायात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.
पोलीस तक्रार करण्यात येईल
आज पेपर रद्द केला आहे. सहा केंद्रावर पेपर सुरु आहेत. पोलिस तक्रार करण्यात येईल. विद्यापीठाचीही समिती नेमण्यात येईल.
- दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मुल्यमापन नियंत्रण मंडळ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.