मलकापूर अर्बन बँकेच्या व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना मारहाण
By सुमित डोळे | Published: December 22, 2023 01:57 PM2023-12-22T13:57:09+5:302023-12-22T13:57:19+5:30
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखाचा प्रताप, दहा जणांवर गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर : मलकापूर अर्बन बँकेच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना बळजबरीने स्वत:च्या कार्यालयात नेत शिवसेना उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली. त्यानंतर व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर शाई फेकून बळजबरीने मजकूर लिहून घेत जीवे मारण्याची धमकी दिली.
गुलमंडी परिसरात बुधवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख सचिन जव्हेरी, मधुसूदन बजाज, धरमदास दर्डा, पंकज साकला, दीपक कारवा, रवींद्र चव्हाण, निखिल मित्तल, जयेंद्र श्रॉफ, आबासाहेब देशमुख व कल्पना ठोकाळे यांच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्याने बँक डबघाईस आली आहे. हजारो ठेवीदारांचे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. त्यामुळे ठेवीदार संघर्ष कृती समितीतर्फे ठेवीदारांनी आंदाेलन छेडले गेले. आंदोलनकांनी बँकेला कागदपत्रांची मागणी केली. मात्र, गुलमंडी शाखेचे व्यवस्थापक विनोद अग्रवाल यांनी कागदपत्र देण्याचे अधिकार मुख्य कार्यालयाला असल्याचे सांगितले. बुधवारी देखील जव्हेरी व अन्य आरोपींनी बँकेत जाऊन कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा अग्रवाल यांनी कागदपत्र देण्यास असमर्थतता दर्शवली. जव्हेरी, बजाज व इतरांनी धिंगाणा घालत सर्व कर्मचाऱ्यांना बँकेबाहेर काढून शाखेला कुलूप लावले. व्यवस्थापक अग्रवाल अन्य कर्मचाऱ्यांना बळजबरीने जव्हेरीच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करून प्रशांत बाहेकर यांचा चष्मा फोडला. इतरांनी चेहऱ्यावर शाई फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. स्वत:ची सुटका करून घेत अग्रवाल व इतरांनी पोलिस ठाणे गाठले. उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, अंमलदार आवेज शेख अधिक तपास करत आहेत.
बँकेच्या २८ शाखा
पुणे, मलकापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर.
४० हजार खाती, ६६९ कोटी ५९ लाखांची बँकेकडे ठेव. त्यात पतसंस्थेच्या २१७ कोटी, तर ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी आहेत.
जुलै २०२३ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. आरबीआयने २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी बँकेवर निर्बंध आणले.