मॅनेजरने कंपनी मालकाला लावला साडेतीन लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:22+5:302021-03-04T04:06:22+5:30
विशाल अशोक पवार (रा. दशमेशनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अमित किरण नहार यांची चिकलठाणा एमआयडीसीमध्ये ...
विशाल अशोक पवार (रा. दशमेशनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अमित किरण नहार यांची चिकलठाणा एमआयडीसीमध्ये हेमय इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी आहे. १२ मे २०२० ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत आरोपी त्यांच्या कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक होता. आवश्यक वस्तू खरेदी - विक्रीचे अधिकार कंपनीने त्याला दिले होते. या कालावधीत आरोपीने कंपनीच्या डीलरकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक दराने वस्तू खरेदी केल्या आणि डीलरला बिले अदा केली. नंतर त्याने या डीलरकडून त्याच्या खात्यावर बिलात जास्त लावलेली रक्कम घेतली. नहार यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आणि त्याच्याविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने कंपनीला ३ लाख ४९ हजार ५६६ रुपयांना गंडविल्याचे समोर आले. याविषयी मंगळवारी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.