संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक
By बापू सोळुंके | Published: September 7, 2024 06:50 PM2024-09-07T18:50:44+5:302024-09-07T19:27:14+5:30
छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या कार्यक्रमत आजी, माजी खासदारांमध्ये हमरी-तुमरी
छत्रपती संभाजीनगर : ग्रामदैवत संस्थान गणपती येथे एका व्यासपीठावर आलेल्या शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या आजी, माजी खासदारांचे मानापमान नाट्य शनिवारी रंगले. खासदार संदीपान भुमरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात ‘प्रोटोकॉल’वरून शाब्दिक चकमक उडाली.
संस्थान गणपतीच्या आरतीसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. भागवत कराड, माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वागतासाठी सर्वप्रथम खैरे यांचे नाव घेतले. यामुळे खा. भुमरे संतापले. त्यांनी घोडेले यांना, ‘प्रोटोकॉल पाळा. देवाच्या ठिकाणी पक्षपात करू नका’, असे कान टोचले. स्टेजवर मंत्री, माजी मंत्री असताना त्यानुसार सन्मान करावा, अशी सूचना केली. तेव्हा घोडेले यांनी मला धर्मसंकटात टाकू नका, असे उत्तर दिले. तेव्हा खैरे यांनी भुमरे यांना उद्देशून 'गप्प रे तू' असा एकेरी उल्लेख केला. भुमरे यांनीही त्यांना 'तूच गप्प बस' असे जशास तसे उत्तर दिले. यानिमित्त आजी, माजी खासदारांमधील हमरी-तुमरी दिसली. खैरेंना आपण माजी झालोय हेच मान्य नाही, असा टोला भुमरे यांनी लगावला.
खैरे चिडचिड करतात- भुमरे
पत्रकारांशी बोलताना खा. भुमरे म्हणाले की, मंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री सावे, माजी केंद्रीय मंत्री कराड उपस्थित होते. त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. मी माझ्यासाठी बोलत नव्हतो. खैरे यांना चिडायची गरज नव्हती. मात्र सध्या ते नुसती चिडचिड करतात. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, देवाच्या दारी असं व्हायला नको.
धार्मिक कार्यक्रमात कसला प्रोटोकॉल- खैरे
खैरे म्हणाले की, माझं स्वागत आधी झालं म्हणून त्यांना राग आला. धार्मिक कार्यक्रमात प्रोटोकॉल नसतो. देवाच्या दरबारात सगळे सारखेच. त्यांचं वागणं बरोबर नाही. त्यांनी चुकीचं केलं. मी भक्त आहे म्हणून शांत बसलो.