महावितरणपुढे मनपाने टेकले हात
By Admin | Published: June 13, 2014 01:10 AM2014-06-13T01:10:46+5:302014-06-13T01:13:16+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे.
औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे. १२ जून रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी फारोळा पंपगृह येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधील २ हजार के.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत १,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी त्यामुळे बंद होती. शहराला पाणीपुरवठाही त्यातून सुरू असतानाच ती जलवाहिनी बंद पडल्यामुळे उद्या १३ जून रोजी अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे, तर काही भागांना पाणीपुरवठा होईल, मात्र उशिरा. असे मनपा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून ती पूर्ण करता-करता पालिका पाणीपुरवठा विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. अधिकारी- नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होण्यापर्यंत वेळ आली आहे, तर नागरिक पालिका आणि महावितरणवर ताशेरे ओढत आहेत. दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, आॅन दी स्पॉट पाहणी झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने १५ लाख देण्याचेही ठरले. ते कामही सुरू झाले आहे; पण सध्या असलेल्या यंत्रणेमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो आहे.
दरम्यान, जनतेच्या हितासाठी महापालिकेच्या पदाधिकारी किंवा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा जोे दबाव महावितरणवर असायला हवा तो नसल्यामुळे महावितरण मनमानी पद्धतीने वागत असल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे. माध्यमांमधून पाणीटंचाईचा विषय पुढे आणल्यानंतरच महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जाग आल्याचे चित्र आहे.
आठ दिवसांची मुदत आज संपणार
महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि मुख्य अभियंता शंकर शिंदे व पथकाने ५ रोजी फारोळा, ढोरकीन येथील महावितरणच्या उपकेंद्रांची पाहणी केली होती.
ढोरकीनच्या एक्स्प्रेस फिडर लाईनला १५ लाख रुपये मनपाते तातडीने दिले. त्या कामाला अंदाजे ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. १४ जून रोजी ती मुदत संपत आहे. फिडर लाईनचे काम झाल्यानंतर भविष्यात वीजपुरवठा खंडित होऊन त्रास होणार नाही. आठ दिवसांत ते काम पालिका जातीने लक्ष घालून करून घेणार होती.
कशामुळे झाली अडचण
पाणीपुरवठ्याच्या जायकवाडीतील योजनांना ज्या सबस्टेशवरून वीजपुरवठा होतो तेथून जालना पाणीपुरवठा योजना व काही उद्योगांना कनेक्शन दिले आहे.
महावितरणने आहे त्याच नेटवर्कमधून कनेक्शन दिल्यामुळे औरंगाबाद पाणीपुरवठ्याला उच्च दाबाने वीज मिळत नाही. परिणामी, २० दिवसांपासून सिडको-हडकोसह शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते आहे.