भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 07:21 PM2021-12-27T19:21:55+5:302021-12-27T19:23:16+5:30
आगामी निवडणुकीत उतरणार बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी
औरंगाबाद : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दरवर्षी शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातील लाखो समाजबांधव हजेरी लावतात. यंदा या कार्यक्रमाला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे; परंतु, काहीही झाले तरी तिथे रिपब्लिकन सेना कार्यक्रम घेणारच आहे. समाजबांधवांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज येथे केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये अवघड परिस्थिती दिसताच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे.. इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्र, तसेच राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत असून ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे षड्यंत्र सुरु आहे, अशी टीकाही आनंदराज यांनी केली.
‘बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी’ निवडणुकीत
आंबेडकरी चळवळीला पोषक असलेल्या सर्व समविचारी पक्ष- संघटनांची आघाडी रिपब्लिकन सेनेने तयार केली असून ‘बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी’च्या माध्यमातून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढणार आहोत, अशी घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केली. तसेच निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीविरुद्ध उमेदवार उभे करणार का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले की, कोणाविरुद्ध लढायचे, कोणासोबत युती करायची ते ऐनवेळी आघाडी निर्णय घेईल.