सुरेल मैफलीचा सखींनी लुटला मनमुराद आनंद
By Admin | Published: April 25, 2016 11:38 PM2016-04-25T23:38:39+5:302016-04-26T00:11:41+5:30
पैठण : मराठी-हिंदीतील नव्या व जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांच्या सूरमयी मैफलीने पैठण विभागातील सखी शनिवारी हरखून गेल्या.
पैठण : मराठी-हिंदीतील नव्या व जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांच्या सूरमयी मैफलीने पैठण विभागातील सखी शनिवारी हरखून गेल्या. खास महिलांसाठीच्या पैठणमधील ‘सखी जल्लोष-२०१६’ या पहिल्याच मैफलीला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनोरंजनाचा उत्स्फूर्त आनंद लुटला.
पैठण विभागात लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शनिवारी (दि.२३) सखी मंच सदस्यांसाठी येथील पीतांबरी मंगल कार्यालयात सायंकाळी या अविस्मरणीय मैफ लीस प्रारंभ झाला. या आनंदोत्सवात महिलांनी अनेकदा ठेकाही धरला. आलाप ग्रुपचे अभिजित शिंदे व सरला शिंदे यांच्यासह निशांत घाटे यांनी उपस्थित श्रोत्यांवर आवाजाची मोहिनीच घातली. गणरायाला नमन करून प्रारंभ झालेल्या या मैफलीत गाजलेली हिंदी- मराठीतील जुनी व नवी गीते धूमधडाक्यात सादर झाली. उत्तरोत्तर या मैफलीची रंगत वाढतच गेली. येथील मनपसंत कलेक्शनतर्फे खास सखीसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले होते. त्यात सविता दिगंबर वडेकर या भाग्यवान विजेत्या ठरल्या.
यावेळी मंचावर नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्ष रेखा कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बच्चनसिंह, नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड, सतीश पल्लोड, पोलीस निरीक्षक अशोक गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पैठणमध्ये आयोजित या मैफलीची व्यवस्था सखी मंचच्या पदाधिकारी अपर्णा गोर्डे, वैशाली विनोद लोहिया, ज्योती काकडे, अश्विनी लखमले, संगीता खरे, अनिता जाधव, सुवर्णा रासने, कीर्ती
भाकरे, मंगल मगर यांनी चोख बजावली.
महिलांना आपले कलागुण सादर करण्यासह व्यक्त होण्यासाठी सखी मंच हे हक्काचे व्यासपीठ. मनोरंजनासह व्यक्तिमत्त्व विकासाचे महाद्वार खुले करणाऱ्या सखी मंचचे सदस्य झालेल्या महिलांना वर्षभर दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद
लुटण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.