सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली भरदिवसा लुटले पादचारी महिलेचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:29 AM2019-07-11T00:29:08+5:302019-07-11T00:29:30+5:30
रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एका चोरट्याने हिसकावून नेले. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या धाडसी लुटीने शहरात खळबळ उडाली.
औरंगाबाद : रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एका चोरट्याने हिसकावून नेले. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या धाडसी लुटीने शहरात खळबळ उडाली.
प्राप्त माहिती अशी की, सिंदोन-भिंदोन येथील रहिवासी अनुसयाबाई शिंदे (५८) यांना पिसादेवी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. यामुळे त्या गावाहून औरंगाबादेत आल्या. गजानन महाराज मंदिराकडून त्या सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ आल्या आणि जालना रोड ओलांडण्यासाठी रिक्षा थांब्याजवळ उभ्या होत्या. यावेळी आकाशवाणीकडे जाणाऱ्या काही रिक्षाचालकांनी त्यांना ‘चला आई, कुठे जायचे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी मला पिसादेवीकडे जायचे आहे, असे सांगितले. तेथे उभ्या दोन आरोपींनी हे ऐकले. एक जण त्यांच्याजवळ आला आणि ‘आजी तुम्हाला कुठे पळशीला जायचे आहे ना, चला रस्ता ओलांडून देतो’, असे म्हणत त्याने अनुसयाबाई यांचा हात धरला. रस्ता ओलांडण्यासाठी तरुण मदत करीत असल्याचे पाहून त्यांना खूप बरे वाटले आणि त्या नि:संकोचपणे त्याच्यासोबत जालना रोड ओलांडून सेव्हन हिल पुलाखालून जाऊ लागल्या. याचवेळी मजबूत शरीरयष्टी असलेला एक जण अचानक त्यांच्याजवळ आला आणि त्याने अनुसयाबाई यांच्या गळ्यातील चार ग्रॅमचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसका देत तोडले. चोरटा आणि अनुसयाबाई यांना मदत करणारा तो तरुण, असे दोघेही सुराणानगरच्या दिशेने सुसाट पळून गेले. यावेळी अनुसयाबाई यांनी चोर, चोर, अशी आरडाओरड करीत त्यांच्यामागे पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना कळविली. याविषयी जिन्सी पोलीस ठाण्यात मंगळसूत्र चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक तुषार देवरे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांची तपासणी केली. काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेºयांत चोरटे कैद झाले असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.