गर्दीत भाविक महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र, रोकड लंपास; मंदिर परिसरातून तीन महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:59 PM2024-08-16T19:59:56+5:302024-08-16T20:00:02+5:30
वेरूळ येथील घटना : महिला आली होती दर्शनासाठी
खुलताबाद : ६५ वर्षीय महिला भाविकाच्या पर्समधील रोख ३५ हजार रूपये व मंगळसूत्र असा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील घृष्णेश्वर मंदिरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांना दुपारी चार वाजता ताब्यात घेत त्यांच्याकडून ऐवज हस्तगत केला आहे. निकिता युवराज जगधने (वय २१), ज्योती तात्याराव खाजेकर (वय ३०, दोघी रा. अंधानेर, ता. कन्नड) आरती सुरेश शिंदे (वय ३५, रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) असे ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील उषा बंडू अप्पा मुळे या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांच्या पर्समधील रोख ३५ हजार रूपये व पाच ग्रॅमचे मंगळसूत्र हा ऐवज गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी महिलेने तक्रार केल्यानंतर मंदिर देवस्थान प्रशासनाने स्थानिक गुन्हे पोलिस शाखेला माहिती दिली.
लागलीच पोलिसांनी सदर तीन महिलांना मंदिर परिसरातून ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ रोख ३५ हजार व मंगळसूत्र आढळून आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक टी. एस. जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील खरात, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील, आनंद घाटेश्वर, महिला पोलिस शिपाई पद्मा देवरे यांनी केली.