बाहेरगावाहून येत छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरी; दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:49 PM2023-05-22T13:49:01+5:302023-05-22T13:50:34+5:30

मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सतत घडत असल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

Mangalsutra theft in Chhatrapati Sambhajinagar coming from outside city; gang arrested | बाहेरगावाहून येत छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरी; दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बाहेरगावाहून येत छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरी; दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महिलांचे मंगळसूत्र हिसकावून दहशत माजविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकलसह ५ लाख २८ हजारांचे दागिने जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणले.

योगेश सीताराम पाटेकर (२४, रा. स्वामी समर्थनगर, गजानननगर, मूळ रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचे साथीदार विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, श्रीरामपूर), अक्षय त्रिभुवन (रा. वैजापूर) आणि राहुल बरडे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सतत घडत असल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली होती. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, रमाकांत पटारे, कर्मचारी सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, संजय नंद, रवींद्र खरात, सुनील बेलकर, संदीप राशीनकर, महेश उगले, नितीन देशमुख, अजय दहीवाळ, नितेश सुंदर्डे, धनंजय सानप, शुभम वीर, प्राजक्ता वाघमारे, अनिता त्रिभुवन, पूनम पारधी, आरती कुसळे, गीता ढाकणे यांनी तपास करून श्रीरामपूरची टोळी उघड केली. आरोपी चोरी करण्यासाठी नगर जिल्ह्यातून येथे आल्यानंतर योगेशकडे मुक्कामी राहत. 

शहरात त्यांना कोणीही ओळखत नसल्याने ते मंगळसूत्र चोरी करण्यासाठी येताना चेहरा झाकत नव्हते. बिनधास्तपणे ते फिरून सावज शोधत. मंगळसूत्र चोरी केल्यानंतर दिवसभर दुचाकी योगेशच्या घरात लपवून ठेवून आराम करणे आणि रात्र झाल्यानंतर ते दुचाकीसह शहरातून पळून जाणे अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत होते. मागील दीड महिन्यात त्यांनी साथीदारांच्या मदतीने आठ महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. पोलिसांनी योगेशला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली देत त्याने साथीदारांची नावे सांगितली.

आरोपीच्या वाट्याला आलेले दागिने जप्त
आरोपी चोरी केल्यानंतर आपसात दागिने वाटून घेत. योगेशच्या वाट्याला आलेले दागिने त्याने श्रीरामपूर येथील एका सोनाराला विक्री केले होते. पोलिसांनी ५ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी अट्टल गुन्हेगार
योगेशविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर ठाण्यात दोन, तर हर्सूल, एमआयडीसी सिडको आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यात प्रत्येकी एक आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. आरोपी विनोद ऊर्फ खंग्या चव्हाणवर शिर्डी, कोपरगाव, लोणी, राहुरी, श्रीरामपूर शहर, अहमदनगर येथील तोफखाना आणि छत्रपती संभाजीनगरातील विविध पोलिस ठाण्यासह एकूण १९ गुन्हे नोंद आहेत. तर आरोपी आकाशवर शिर्डी व छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ गुन्हे नोंद आहेत.

Web Title: Mangalsutra theft in Chhatrapati Sambhajinagar coming from outside city; gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.