मांगीरबाबा यात्रेत १०० वर्षांच्या गळ टोचणीच्या परंपरेला तिलांजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:07 PM2019-04-24T18:07:49+5:302019-04-24T18:14:34+5:30
मांगीरबाबा देवस्थान समिती व पोलिसांनी केली जनजागृती
- श्रीकांत पोफळे
शेंद्रा (औरंगाबाद ) : मांगीरबाबा देवस्थान समिती व पोलिसांनी केलेली जनजागृती तसेच मंगळवारी भाविकांना गळ न टोचण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर वर्षांच्या परंपरेला भाविकांनी पहिल्या दिवशी तिलांजली दिल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे लोकसभेचे मतदान व यात्रा एकाच दिवशी आल्याने भाविकांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.
मांगीरबाबाच्या दर्शनाला राज्यासह परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. शेंद्रा येथे मंगळवारी सकाळी जवळपास एक लाख भाविक दाखल झाले होते. ‘मांगीरबाबा की जय’च्या घोषणेने शेंद्रा परिसर दणाणून गेला होता.
पहाटेपासून नवस फेडणारे भाविक अनवाणी मंदिराकडे जात होते. नवस केलेल्या महिला व पुरुषांना चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेण्यात येत होते. बाबांच्या मंदिरासमोर मंडप टाकल्यामुळे भाविकांसाठी मुबलक सावली होती. रेवड्यांची उधळण करीत बाबांच्या जयघोषाने मंदिर परिसरात अत्यंत उत्साहाचे वातावरण होते.
यंदा मतदानाचा व यात्रेचा एकच दिवस आल्याने भाविकांची संख्या ४० टक्क्यांनी घटल्याचा प्राथमिक अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे; परंतु उद्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उद्या भाविक गळ टोचणीस फाटा देतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मंदिराच्या शेजारी देवस्थान समितीचे कार्यालय असून, समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेतली जात होती. यासाठी सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, सदस्य रेखा तांबे, नूरजहाँ पठाण, रवींद्र्र तांबे, दिलीप कचकुरे, अप्पासाहेब कचकुरे, सुखदेव नवगिरे हे विशेष परिश्रम घेत होते. याठिकाणी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल यांच्यासह ११ पोलीस अधिकारी व १०० कर्मचारी बंदोबस्तावर होते.