मंगरुळे गेले माघार घेण्यासाठी; पण मध्येच फिरले माघारी!
By योगेश पायघन | Published: March 6, 2023 08:38 PM2023-03-06T20:38:48+5:302023-03-06T20:39:05+5:30
व्यवस्थापन परिषद निवडणूक : शिक्षक प्रवर्गात तिरंगी, ३ गटांत थेट विद्यापीठ विकास मंच आणि ‘उत्कर्ष’मध्ये थेट लढत
छत्रपती संभाजीनगर: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या संस्थाचालक गटातून भरलेली उमेदवारी माघार घेण्यासाठी गेलेले असताना नाट्यमय घडामोडीनंतर ते शेवटच्या पाच मिनिटांत माघारी फिरले. उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांत तीन गटांत थेट लढत होणार आहे, तर शिक्षक गटात तिरंगी लढत रंगणार आहे. त्यासाठी १२ मार्च रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत मतदान होणार आहे.
उमेदवारी माघार घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखेरची मुदत होती. त्यापूर्वी दोन दिवसांपासून ‘उत्कर्ष’चे सर्वेसर्वा आ. सतीश चव्हाण यांच्याकडे बिनविरोध निवडणुकीसाठी बैठकांचे सत्र झडले. त्यानंतर एक सदस्य ‘उत्कर्ष’कडून लढण्यास तयार झाल्याने ‘उत्कर्ष’चे सुनील मगरे यांना अर्धी ‘टर्म’ देण्यासंदर्भात चर्चाही झाली. मात्र, विद्यापीठ विकास मंचकडून २-२ असा प्रस्ताव होता, तर ‘उत्कर्ष’कडून ३-१ वर बोलणी झाली. मात्र, ती फिसकटल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगरुळे यांना बिनविरोध निवडून येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरूनही प्रयत्न झाले. मात्र, यश न आल्याने त्यांनी माघार घेण्यासाठी पंकज भारसाखळे यांच्यासह विद्यापीठ गाठले.
आत बाहेर, आत बाहेर....
मंगरुळे हे माघार घेण्याचा अर्ज जमा करायला जाणार, तोच त्यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनाफोनी झाली. त्यादरम्यान, रमेश आडसकर पोहोचले अन् मंगरुळे माघारी फिरले. त्यावेळी उत्कर्ष पॅनलकडून निवडून आलेले नरेंद्र काळे, दत्ता भांगे, भारत खैरनार, हरिदास सोमवंशी, विक्रम खिल्लारे हे मुख्य इमारतीत चारही बाजूंनी उभे होते. मंगरुळे यांनी माघार ऐन वेळी टाळल्याने गोविंद देशमुखांविरोधात ते उमेदवार असतील. आ. चव्हाण यांनी ऐनवेळी फोन बंद केल्याबद्दल खंत आडसकर, मगरे यांच्याकडे बोलून दाखवली अन् आता लढूच, असे म्हणत हस्तांदोलन केले व काढता पाय घेतला.
भांगे, पाटील, जाधव, सावंत बिनविरोध
अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यावर रिंगणातील १३ उमेदवारांची अंतिम यादी कुलसचिव भगवान साखळे यांनी जाहीर केली. त्यातील राखीव ४ जागांवर प्रत्येकी एकच उमेदवार असल्याने पदवीधर- व्हीजेएनटी प्रवर्ग दत्तात्रय भांगे, प्राचार्य-एससी प्रवर्ग डॉ. गौतम पाटील, संस्थाचालक-एसटी प्रवर्ग नितीन जाधव आणि शिक्षक-ओबीसी प्रवर्ग डॉ. रविकिरण सावंत हे बिनविरोध निवडून आले. १२ मार्च रोजी त्यांच्या विजयी घोषणेची केवळ औपचारिकता उरली आहे.
या गटात आता थेट लढत
गट - उत्कर्ष पॅनल - विद्यापीठ विकास मंच - माघार
संस्थाचालक -गोविंद देशमुख -बसवराज मंगरुळे -मेहेर पाथ्रीकर
प्राचार्य -भारत खंदारे -डॉ. विश्वास कंधारे -बाबासाहेब गोरे
पदवीधर -सुनील मगरे -योगिता होके पाटील -हरिदास सोमवंशी
शिक्षक गटात तिरंगी लढत
उत्कर्ष पॅनलकडून निवडून आलेले मुंजाबा धोंडगे आणि बामुक्टो या प्राध्यापक संघटनेचे डॉ. विक्रम खिल्लारे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. उत्कर्ष पॅनलकडून डॉ. अंकुश कदम, तर विद्यापीठ विकास मंचकडून डॉ. भगवानसिंग डोभाळ आणि स्वाभिमानी मुप्टाचे डाॅ. शंकर अंभोरे ही लढत तिरंगी होईल.