कुंभेळफची मनीषा शेळके सर्वांत कमी वयाच्या, तर बोडख्याचे अशोक जाधव सर्वांत ज्येष्ठ सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:05 AM2021-01-25T04:05:56+5:302021-01-25T04:05:56+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयाच्या सदस्यांना कौल --- औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यात ...
ग्रामपंचायत निवडणूक : तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयाच्या सदस्यांना कौल
---
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यात मतदारांनी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयाच्या सदस्यांना कौल दिला. त्यातही तरुणांची संख्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक असून, जुन्या जाणत्या ज्येष्ठांनाही मतदारांनी पसंती दिली. कुंभेफळ येथील २१ वर्षीय मनीषा शेळके या जिल्ह्यातील सर्वांत कमी वयाच्या, तर बोडखा येथील ७२ वर्षीय अशोक जाधव चौथ्यांदा निवडून येत सर्वांत जास्त वयाचे सदस्य ठरले आहेत.
नऊ तालुक्यांतील ४६९९ सदस्य ६१७ ग्रामपंचायतींतून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे ४०८१ सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार उभे होते. वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३, पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयगांव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक झाली.
अटीतटीच्या लढतीत नवख्या उमेदवारांनीही चांगली लढत दिल्याचे पाहायला मिळाले, तर जुन्या जाणत्या ज्येष्ठांनीही कस पणाला लावून बाजी मारल्याचे चित्र जिल्ह्यात आले. अनेक सदस्य चौथ्या - पाचव्या वेळेसही पुन्हा निवडून आले, तर पाच ते सहा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सदस्यांना यावेळी संधी मिळाली नाही.
----
मनीषाचे वय २१ वर्षे
---
कुंभेफळ येथील ज्ञानेश्वर शेळके यांच्या कन्या मनीषा या अवघ्या २१ वर्षांच्या असून, जेएनईसी काॅलेजमधून सध्या साॅफ्टवेअर इंजिनिअरच्या पदवीचे शिक्षण घेत आहेत. शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या मनीषा यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या सक्रिय पदाधिकारी महिलेचा २८८ मतांनी पराभव केला. वडील शेती करतात. घरात राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विजय मिळवून जिल्ह्यातील सर्वांत तरुण सदस्य होण्याचा मान पटकावला आहे.
----
गावाच्या विकासात नव्या संकल्पना राबविण्याचा मानस आहे. व्यायामशाळा, अभ्यासिका गावात सुरू करायची असून, वयोवृद्ध लोकांसह गावातील लोकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देईन. योजनांचा लाभ लाभार्थींना मिळवून दिला, तर त्यातून गावाचा विकास नक्कीच होईल.
- मनीषा शेळके, ग्रामपंचायत सदस्य, कुंभेफळ
---
बोडख्याच्या जाधवांचे वय ७२ वर्षे
---
पहिल्या टर्ममध्ये उपसरपंच, दुसऱ्या टर्मला सरपंच, त्यानंतर सदस्य, तर सलग चौथ्यांदा ७६ मतांनी पुन्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. नऊजणांपैकी सहाजण त्यांच्या गटाचे निवडून आले आहेत. आधीच्या कार्यकाळात विकासकामे केली म्हणून त्यांना मतदारांनी पुन्हा पसंती दिली आहे. ते शेती करत असून, त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
---
गावातील नादुरुस्त रस्ते, समाज मंदिरे यांचा कायापालट करायचा आहे. गंदेश्वर धरणाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून बोडखा, धामणगाव या भागातील शेती सिंचनाखाली आणणे, गावातील बंद बस पुन्हा सुरू करणे तसेच गावात सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ड्रेनेजलाईन बनवायची आहे.
- अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्य, बोडखा
---
२३४९ निवडुन आलेले पुरुष सदस्य
--
२३५० निवडुन आलेले महिला सदस्य
--
६१७ ग्रामपंचायतींची झाली निवडणूक