मांजा निष्पाप पक्षांच्या जीवावर; तरुणांच्या प्रयत्नाने पारव्याला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 01:45 PM2021-12-24T13:45:56+5:302021-12-24T13:47:49+5:30
पतंग शौकिनांकडून धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
औरंगाबाद : मांजा दोरा वापरण्यास बंदी असतानाही पतंग उडविणारे याचा सर्सास वापर करत आहेत. मात्र, या मंजामध्ये अडकून पक्षी जखमी होत आहेत, कित्येक पक्षांचा मृत्यू होत आहे. पतंग शौकिनांसाठीचा काही वेळचा आनंद निष्पाप पक्षांच्या जीवावर येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना शहरातील उत्तम नगर येथे बुधवारी घडली. एक पारवा पतंगाच्या मांज्यात अडकून जमिनीवर तडफडत होता. हे दृष्य पाहताच तरुणांनी लागलीच त्याची मांजातून सुटका करत जीवनदान दिले.
संक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पतंग शौकिनांकडून धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या मांजामुळे पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. शहरातील उत्तमनगर परिसरात मान, पाय आणि पंखात मांजा अडकल्याने एक पारवा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. तो उडण्यासाठी प्रयत्न करीत होता. ही बाब मयूर चव्हाण, सचिन सदावर्ते, पंकज गुडदे या तरुणांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ त्या पारव्याकडे धाव घेतली.
पारव्याच्या पंखात अडकलेल्या मांज्याने एका तरुणाचा संपूर्ण हात भरून गेला होता, इतका मांजा त्या मुक्या जिवाभोवती अडकला होता. संपूर्ण मांजा काढल्यानंतर या पारव्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली. नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रकार वाढत असून, पतंग शौकिनांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन पारव्याला जीवनदान देणाऱ्या तरुणांनी केले आहे.