मनोज दादा मला पाडण्याचे आदेश देता, आमचे काय चुकले? अपक्ष उमेदवाराची माघारीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:00 PM2024-11-07T16:00:37+5:302024-11-07T16:09:18+5:30
अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्ह करून निवडणुकीतून केली माघारीची घोषणा
फुलंब्री : मनोज दादा तुम्ही मला पाडण्याचे आदेश देताय, ही माझ्यासाठी दु:खदायक बाब आहे. मी समाजाच्या हितासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. प्रामाणिकपणे काम करीत असताना आमचे नेमके काय चुकले? आपल्या निर्णयामुळे प्रचाराचे नारळ फोडण्याची तयारी करीत असताना आता मी निवडणुकीतून माघार घेतोय, अशी घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून केली.
गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी मागील काही वर्षांपासून केलेली आंदोलने चर्चेची झाली आहेत. यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली. जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. यात त्यांना एकूण दीड लाख मते मिळाली होती. त्यांना सर्वाधिक म्हणजे ४१ हजार ३४३ मते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती तर फुलंब्री मतदारसंघातून ३९ हजार ३८३ मते मिळाली होती. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी अनेकवेळा जरांगे यांची भेट घेतली होती.
ग्रामस्थांसमोर तयार केला व्हिडीओ
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे मंगेश साबळे यांनी बुधवारी गावात ग्रामस्थांना सोबत घेऊन एक सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्ह केले. त्यात ‘मी अपक्ष निवडणूक लढवित असतानासुद्धा मनोज दादा मला तुम्ही पाडण्याचे आदेश देता, ही बाब मला समजणारी नाही. तुमच्या आदेशामुळे मी निवडून येणार नाही. त्यामुळे निवडणुकीतून ताघार घेतो, अशी घोषणा केली.