मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Published: November 7, 2023 07:44 PM2023-11-07T19:44:25+5:302023-11-07T19:45:04+5:30

मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ भूजबळ यांना समज द्यावी

Manoj Jarange appeals to Maratha leaders to come together to defeat the conspiracy against Marathas | मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन

मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते छगन भुजबळ हे सतत मराठा समाजाला टारगेट करीत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ते षडयंत्र करीत आहेत, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्रपणे  समाजासोबत उभे राहावे,असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केले. तसेच मराठा नेत्यांनी आता साथ दिली नाही तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही,असा इशाराही जरांगे यांनी दिला.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी राज्यसरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कार्यकक्षा आणि व्याप्ती राज्यभर वाढविली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात मराठा समाज हा कुणबी असल्याच्या पुराव्यांचे आकडे वाढू लागले आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहोत. मात्र आमच्या हक्काचे तुम्ही इतके दिवस खात होता.आता आम्ही आमचा हक्क मागू लागल्याने ओबीसी नेते असलेले मंत्री छगन भूजबळ गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाबद्दल द्वेषपूर्ण बोलत आहेत. त्यांच्या मनात मराठ्यांविषयी एवढा राग का आहे, हे कळत नाही. मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.मात्र खेड्यापाड्यातील ओबीसी समाजाच्या हे लक्षात आले आहे. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे भुजबळांचे मनसुबे पूर्ण होणार नाही,असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.  

भूजबळ यांना समज द्या
मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ भूजबळ यांना समज द्यावी, अशी सूचनाही जरांगे यांनी केली. बीड पोलिसावर हे (भुजबळ) दबाव टाकत आहे. दबावतंत्र थांबलं नाही तर जो निर्णय उशिरा घ्यायचं आहे तो आता घ्यावा लागेल,अशा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Web Title: Manoj Jarange appeals to Maratha leaders to come together to defeat the conspiracy against Marathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.