मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत
By बापू सोळुंके | Published: June 15, 2024 05:29 PM2024-06-15T17:29:13+5:302024-06-15T17:29:35+5:30
अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात राज्यसरकार सकारात्मक आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत सगे साेयऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही,अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांच्यासह रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, मी आज मुद्दामहुन जरांगे पाटील यांच्या तब्यतेची चौकशी करायला मुंबईहून आलो आहे.
मराठा आरक्षणाप्रमाणेच सरकार यांच्यासाठी जरांगे यांच्या प्रकृतीलाही प्राधान्य आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदणी तत्कालीन हैदराबाद स्टेट च्या गॅझेटमध्ये असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. या नोंदी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यकता पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी स्वत: हैदराबादला जाईन. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यसरकारने केलेल्या कामाचे मनोज जरांगे यांनी कौतुक केले आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन संदीप शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, तसेच वंशावळ समितीला मुदतवाढ देणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. यासदंर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आ.शिरसाट यांची उपस्थिती होती.