जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन
By सुमित डोळे | Published: December 21, 2023 02:45 PM2023-12-21T14:45:34+5:302023-12-21T14:46:20+5:30
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व अन्य पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दि. २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी मराठा समाजबांधवांशी आयुक्तालयात चर्चा करून शांततेचे आवाहन केले. तेव्हा उपस्थितांनी त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले. सोबतच आंदोलनाचा निर्णय मनोज जरांगे घेतील, असे स्पष्ट केले.
शहरातील मराठा आरक्षणाच्या समन्वयकांना आयुक्तालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्याकडून परिस्थिती समजावून घेतली. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून, शांततेच्या मार्गाने करा. पोलिसांना विश्वासात घ्या. तुमचे म्हणणे आम्ही निश्चित शासनापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन लोहिया यांनी उपस्थितांना दिले. यावेळी राजेंद्र जंजाळ, चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, सुरेश वाकडे, मनोज गायके, ॲड. सुवर्णा मोहिते, रेखा वाहटुळे, गणेश उगले, सुकन्या भोसले, विजय काकडे यांची उपस्थिती होती.
पोलिसांच्या सुट्या रद्द
पोलिसांनी दि. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत शहरातील सर्व आंदोलन, मोर्चे शांततेत, शिस्तबद्ध पार पडले. यापुढेही हाच पायंडा कायम राहावा, यासाठी पोलिसांनी विविध गट, संघटनेसोबत संवाद सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व अन्य पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सातत्याने सोशल मीडियावर नजर असून, आक्षेपार्ह पोस्ट, कॉमेंटवर निगराणी सुरू आहे...