नियमबाह्य काम करण्यासाठी मनपा लिपिकाला माजी नगरसेविकेच्या पतीची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:44 PM2024-10-04T12:44:13+5:302024-10-04T12:44:34+5:30
नियमबाह्य काम करण्यासाठी मनपा लिपिकाला मारहाण, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी
छत्रपती संभाजीनगर : नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकून मनपाच्या वरिष्ठ लिपिकाला माजी नगरसेविकेचे पती महेंद्र सोनवणे यांनी मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मनपाच्या मुख्य कार्यालयात ही घटना घडली.
ईश्वर दगडू जाधव (वय ३८, रा. संजयनगर) हे महानगरपालिकेत रमाई घरकुल कक्षात वरिष्ठ लिपिक आहेत. घरकुलाच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याचे काम आहे. सोनवणे गेल्या अनेक दिवसांपासून या कामासाठी त्यांच्याकडे जात होते. जाधव यांच्या आरोपानुसार, सोनवणे त्यांना संबंध नसलेल्या कामाकरिता दबाव टाकत होते. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जाधव कार्यालयात असताना सोनवणे व अन्य तिघांनी दालनात जात जाधव यांचा थेट गळा पकडला. हाताचापटाने मारहाण करून ढकलून दिले. त्यांना मारहाण होत असताना जाधव यांचा एकही सहकारी त्यांना वाचवण्यासाठी धावला नाही.
जाधव यांनी सोनवणेला नियमबाह्य काम करणार नाही, असे पुन्हा सांगितले. तेव्हा त्यांना महिलांकरवी मोठ्या गुन्ह्यात अडकवून नोकरीतून बरखास्त करण्याची धमकी सोनवणेने दिली. जाधव यांनी रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी सोनवणेवर गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक निवृत्ती गायके अधिक तपास करत आहेत.