कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारावर मनपाने खर्च केले १ कोटी ४६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:06+5:302021-06-09T04:05:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू संख्या अत्यंत कमी होती. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढली. मृत्यूचे प्रमाणही दहा पट ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू संख्या अत्यंत कमी होती. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढली. मृत्यूचे प्रमाणही दहा पट वाढले. औरंगाबादेत उपचार घेण्यासाठी मराठवाडा आणि इतर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येऊ लागले. शहरातील शासकीय अथवा खासगी रुग्णालयात मरण पावलेल्या कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार महापालिकेमार्फत करण्यात आले. मागील पंधरा महिन्यांमध्ये मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार २७० असली तरी संशयित रुग्णांची संख्या यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेने आतापर्यंत १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने कोरोनाने मरण पावलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम ठरवून दिले. त्यानुसार आजपर्यंत अंत्यसंस्काराची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. शहरातील ९० पेक्षा अधिक रुग्णालयांना कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय घाटी रुग्णालयात सर्वाधिक गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात आले. एकट्या घाटी रुग्णालयात २ हजार ७९८ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांचा आकडा मार्च आणि एप्रिलमध्ये जवळपास अडीच हजार होता. संशयित मृतदेहांवरही शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच अंत्यसंस्कार करण्यात आले. मार्च २०२० मध्ये कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने पंचशील महिला बचत गट आणि मोईन मस्तान यांच्या सेवाभावी संस्थेला काम दिले. मस्तान पहिल्या दिवसापासून मोफत अंत्यसंस्कार करीत आहे. महापालिकेकडून एक रुपयाही मानधन ते घेत नाहीत. पंचशील महिला बचत गटाला एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड व इतर खर्च असे अडीच हजार रुपये महापालिकेकडून स्मशानजोगीला देण्यात येतात.
एका अंत्यसंस्काराला पाच हजारांहून अधिक खर्च
कोरोनाने मरण पावलेल्या एका नागरिकाच्या अंत्यसंस्काराला जवळपास पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. किमान ४ क्विंटल लाकूड लागते. १०० गवऱ्यासाठी ४०० ते ५०० रुपये लागतात. १० लीटर डिझेलची गरज भासते. शंभर रुपये दरानुसार एक हजार रुपये याचे होतात. पीपीई किटचा खर्च वेगळाच असतो. पावसाळ्यात हा खर्च अधिक वाढू शकतो. मुस्लीम समाजाच्या व्यक्तीला कफन, कबर खोदणारा, पीपीई किट असा सर्व पाच हजारांपेक्षा जास्त खर्च जातो. यासाठी महापालिकेकडून एक रुपयाही देण्यात येत नाही.
मनपाच्या आरोग्य विभागाकडून सर्व देखरेख
अंत्यसंस्कारासाठी नेमण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांना एका मृतदेहासाठी ५ पीपीई किट मोफत देण्यात येतात. रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेणे आणि नियमानुसार स्मशानभूमीत घेऊन अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधित स्वयंसेवी संस्थेवर असते. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कर्मचारी नेमले आहेत.
व्यवस्थितरित्या काम सुरू आहे
महापालिकेने पहिल्या दिवसापासून नेमलेल्या स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्ण आणि संशयित कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. स्वयंसेवी संस्थेला अडीच हजार रुपये तर लाकडासाठी स्मशानजोगीला अडीच हजार रुपये महापालिकेकडून देण्यात येतात. आतापर्यंत १ कोटी १६ लाख ७७ हजार ५०० रुपये स्मशानजोगींना देण्यात आले. २४ लाख ८६ हजार पंचशील बचत गटाला दिले.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
नियमानुसार अंत्यविधी
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांपासून मयत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी केले जात आहेत. शासनाने जे नियम घालून दिले आहे, त्यानुसार हे अंत्यसंस्कार होत आहे. आतापर्यंत अंत्यसंस्कारासंदर्भात काहीही तक्रार आलेली नाही.
-डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
१,४३,८०३ जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित
१,३८,१३३ जिल्ह्यातील एकूण रुग्ण बरे होऊन घरी गेले
३,२७० रुग्णांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू
२,४०० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत
२,७९८ रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू
४७२ रुग्णांचा खाजगी रुग्णालयांमध्ये मृत्यू
सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२२