सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या मनुष्यबळाचा तिढा सुटला
By | Published: December 4, 2020 04:04 AM2020-12-04T04:04:58+5:302020-12-04T04:04:58+5:30
औरंगाबाद : घाटीतील अतिविशेषोपचार रुग्णालय म्हणजे सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात ...
औरंगाबाद : घाटीतील अतिविशेषोपचार रुग्णालय म्हणजे सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह राज्यातील ४ रुग्णालयांच्या ८८८ पदांच्या निर्मितीला बुधवारी मान्यता मिळाली; परंतु मान्यता दिलेल्या पदांची संख्या पाहता कमी मनुष्यबळावर रुग्णसेवेची कसरत करण्याची वेळ ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबादेतील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी पहिल्या टप्प्यात ८८८ पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या मनुष्यबळाचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळत होता. त्यामुळे रुग्णसेवेत अनेक अडचणी येत आहेत. सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी वर्ग-१ ते वर्ग ४ पर्यंतच्या ४५२ पदांचा प्रस्ताव शासनाकडे वर्षभरापूर्वी देण्यात आला होता.
८८८ जागा म्हणजे ४ रुग्णालयांना प्रत्येकी २२२ मनुष्यबळ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी पदे मिळू शकतील; परंतु तोपर्यंत आवश्यकतेच्या निम्म्याच मनुष्यबळात रुग्णसेवा द्यावी लागणार असल्याचे दिसते.
अनेकांचा पाठपुरावा
८८८ पदांत घाटीला किती पदे मिळणार, हे अद्याप कळले नाही; परंतु पदनिर्मितीला मान्यता मिळाली, ही अधिक महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.