मिल्क पावडर, डालडा अन् पामतेलाच्या मिश्रणातून बनावट खव्याची निर्मिती, कारखान्यावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:15 PM2024-10-31T14:15:48+5:302024-10-31T14:18:09+5:30

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरात लाखो रुपयांचा धोकेदायक भेसळयुक्त खवा जप्त; पूर्वी कारवाई झालेल्या कारखान्यात पुन्हा भेसळयुक्त खव्याची निर्मिती सुरू झाली होती.

Manufacture of fake khawa from mixture of milk powder, dalda and palm oil, factory seized in Chhatrapati Sambhajinagar | मिल्क पावडर, डालडा अन् पामतेलाच्या मिश्रणातून बनावट खव्याची निर्मिती, कारखान्यावर छापा

मिल्क पावडर, डालडा अन् पामतेलाच्या मिश्रणातून बनावट खव्याची निर्मिती, कारखान्यावर छापा

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत मिटमिटा भागात धोकेदायक पद्धतीने भेसळयुक्त धोकादायक खवा तयार करणारा कारखाना उघडकीस आला आहे. बुधवारी सायबर पोलिसांच्या पथकाने गिरेन सिंग बच्चनलाल सिंग याच्या ‘दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट’वर छापा टाकून जवळपास ६ क्विंटल बनावट खव्याचे साहित्य जप्त केल्याचे सायबर ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त शहरात नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या बाजारपेठेत मात्र मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवाच बनावट वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबत कारवाईच्या सूचना केल्यानंतर तपासादरम्यान मिटमिटाच्या उस्मानिया कॉलनीत ‘दिव्यांश मिल्क अँड डेअरी’त भेसळयुक्त खवा, अन्य मिठाई तयार होत असल्याची माहिती पांढरे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकासह कारखान्यावर छापा मारला. तेव्हा तिथे अस्वच्छ ड्रम व भांड्यांमध्ये खवा तयार करणे सुरू होते.

उत्तर प्रदेशवरून मिल्क पावडर
गिरेन उत्तर प्रदेशवरून कमी किमतीत मिल्क पावडर आणतो. उकळत्या पाण्यात डालडा, पामतेल, पाणी, खाता सोडा मिसळून ड्रममध्ये झटपट मोठ्या प्रमाणावर खवा तयार केला जात होता. उपनिरीक्षक संदीप शिंदे, सागर पाटील, अंमलदार अशरफ सय्यद, विनोद परदेशी, रंजक सोनवणे, सुनील जाधव, सुधीर मोरे, सुधीर मोरे, सतीश हंबर्डे, राजाराम वाघ, सुनील बेलकर, अजय दहिवाळ, प्रमोद सुरसे, सोहेल पठाण यांनी कारवाई केली.

यापूर्वी कारवाई, तरीही
गिरेनवर गेल्यावर्षीच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली होती. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्याच्यावर गुन्हादेखील दाखल आहे. तरीही त्याने त्याच परिसरात पुन्हा कारखाना उघडला. त्याच्या कारखान्यातून ४२५ किलो बनावट खवा जप्त करण्यात आला. शिवाय १५० किलो बनावट साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध मिठाईदेखील आढळून आल्या; परंतु त्याला बनावट ग्राह्य धरण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाने नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Manufacture of fake khawa from mixture of milk powder, dalda and palm oil, factory seized in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.