जिल्ह्यात तब्बल १२ हजार हेल्थ वर्कर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:02 AM2021-03-04T04:02:01+5:302021-03-04T04:02:01+5:30
संसर्ग अन् प्रसाराचा धोका : काेरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणजे रुग्णालयांत सेवा, तरीही लसीकडे पाठ संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाविरूद्धच्या लढाईत ...
संसर्ग अन् प्रसाराचा धोका : काेरोनाचा हाॅटस्पाॅट म्हणजे रुग्णालयांत सेवा, तरीही लसीकडे पाठ
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाविरूद्धच्या लढाईत लसींना सुरक्षेची ढाल म्हटलीे जात आहे. या लसीकरणाचा तिसरा टप्पा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. परंतु जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील तब्बल १२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. आरोग्य यंत्रणा मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही.
देशभरासह औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा दिली. त्यामुळे या कोरोना योध्द्यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणासाठी ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली. मात्र, दीड महिना उलटून गेला. अद्याप या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. त्यानंतर १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठांना आणि व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. मात्र, तब्बल ४० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्याचे टाळले आहे. लसीकरण हे एच्छिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनेही त्यांच्यापुढे हात टेकले आहेत.
----
काय आहे धोका?
लसीमुळे प्रतिकारशक्ती तयार होते. ही प्रतिकारशक्तीच कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत करते. आरोग्य कर्मचारी रुग्णालयात काम करतात. याठिकाणी कोरोना रुग्ण दाखल असतात. त्यामुळे रुग्णसेवा देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढतो. अनेकांत कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत; परंतु त्यांच्या माध्यमातून प्रसार होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
------
जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची स्थिती
एकूण आरोग्य कर्मचारी- ३३,०००
पहिला डोस घेतलेले कर्मचारी- २०,१२६
लस न घेणारे कर्मचारी- १२,८७४
लसीकरणाची टक्केवारी- ६०.९८ टक्के
लस घेणारे शहरातील कर्मचारी- ११,८४९
लस घेणारे ग्रामीण भागातील कर्मचारी- ८,२७७
---
लस घेण्यासाठी पुढे यावे
कोरोनावर उपचार घेण्यापेक्षा, क्वारंटाईन राहण्यापेक्षा आणि रेमडेसिवर इंजेक्शन घेण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे कधीही चांगले आहे. लस घेतली नाही, तर कोरोना होण्याची आणि एकप्रकारे कोरोनाचे वाहक होण्याचीही भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचारी यांनी लस घेण्यासाठी पुढे यावे.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आराेग्य अधिकारी