शहरातील तब्बल १९ वार्ड बनले डेंजर झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:02 AM2021-03-10T04:02:17+5:302021-03-10T04:02:17+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नेमके करावे तरी काय, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला ...
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नेमके करावे तरी काय, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. १९ वार्डमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे महापालिकेला निदर्शनास आले. सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या वार्डला रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. ५० वार्डमध्ये रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात आहेत. या भागातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. रेड झोनमधील सर्व वॉर्डांमध्ये पालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. गेल्या आठ–दहा दिवसांत दररोज ३५० ते ३७० रुग्ण आढळून येत आहेत. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. सुमारे तीनशे कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य कोरोनाबाधित झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे कोविड केअर सेंटर्स आणि खासगी दवाखानेदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत. रात्रीची संचारबंदी, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत; मात्र त्याचा किंचितही फरक पडलेला नाही.
महापालिकेने वाढत्या रुग्णसंख्येसोबत वेगवेगळी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या माहितीनुसार शहरातील तब्बल १९ वॉर्ड सध्या कोरोनाच्या दृष्टीने रेडझोन झाले आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. नेमके या भागात रुग्ण का वाढत आहेत, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यावर लगेच काय उपाययोजना करता येईल ,हे सुद्धा सुरू आहे.
हे आहेत डेंजर झोनमधील वार्ड
सातारा - देवळाई, पडेगाव - मिटमिटा, खडकेश्वर, नागेश्वरवाडी, शिवनेरी कॉलनी सिडको एन ९, पवननगर, आयोध्यानगर, सिडको एन १,एन ५, हुसेन कॉलनी, विश्रांतीनगर, कामगार चौक, उल्कानगरी, सुराणानगर, गादिया विहार, शिवाजीनगर, गुरुदत्तनगर, कांचनवाडी, देवानगरी या वॉर्डांचा त्यात समावेश आहे.
सर्वाधिक कोरोना चाचणी याच भागात
डेंजर झोनमध्ये असलेल्या वॉर्डांमध्ये आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर (कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्ती) भर दिला जाणार आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती शोधून काढून त्यांची कोरोना चाचणी करणे, त्यांचे विलगीकरण करणे यावर भर दिला जाणार आहे. ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा दिली आहे, त्या व्यक्ती घरातच राहतात, याची खात्री सतत केली जाणार आहे. होम आयसोलेशनमधील व्यक्तींनी घराच्या बाहेर पडू नये, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे डॉ. पाडळकर म्हणाल्या.