अनेक बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती
By बापू सोळुंके | Published: November 12, 2023 02:28 PM2023-11-12T14:28:19+5:302023-11-12T14:29:17+5:30
दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजबांधवांनी आत्मबलिदान दिले. कालच आपण देवगाव रंगारी येथे आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांच्या घरातील परिस्थिती पाहून मन सुन्न झाले. अशा परिस्थितीत आम्ही यंदाची दिवाळी साजरी करणार नसल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत हाेते. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मराठा कुणबी नोंदींचा शोध सुरू झाली आहे. ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम झाले आहे. यामुळे हे ५०टक्के काम झाले. आता उर्वरित लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आपण आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे आपण सर्वांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारची प्रतिक्षा करू. १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करायचे आहेत. कोणीही आत्महत्या करू नये, आत्महत्या केल्यास आरक्षण कोणाला द्यायचे, असा सवालही त्यांनी तरूणांना केला.
राज्य सरकारने २४ डिसेंबर ही मुदत दिलेली असताना साखळी उपोषण सुरू करून मनोज जरांगे पाटील हे सरकारवर दबाव टाकत असल्याचा आरोप तुमच्यावर होत आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही साखळी उपोषण शांततेत करणार आहोत, शिवाय उपोषणही सनदशीर मार्गानेच केले. विदर्भातील मराठा बांधवांनी विनंती केल्याने त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी जाणार आहे, यातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसरकारनेही २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा मराठा समाजाला पुन्हा शांतीचे ब्रम्हास्त्र काढावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी नेत्यांनी जाती,पातीमध्ये भांडण लावू नये
ओबीसी नेते छगन भुजबळ हे अंबड येथे जाहिर सभा घेत आहेत. या सभेकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी समाजालाच वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. केवळ ओबीसी नेते मराठा समाजाविरोधात विष पसरवित आहेत. ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना विरोध करण्याचा उगाच हट्ट धरू नये, जाती, जातीमध्ये भांडण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.