जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना

By सुमित डोळे | Published: July 24, 2023 08:11 PM2023-07-24T20:11:19+5:302023-07-24T20:12:12+5:30

जुगाराच्या ठेकेदारांवर आधीचे तब्बल वीस गुन्हे दाखल

Many contractors underground by locking up gambling dens; The police had an idea about the use of children | जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना

जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून जुगाराची वसाहत चालविणाऱ्या ठेकेदारांवर तब्बल वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या या गैरकृत्याबाबत, अल्पवयीनांच्या सहभागाविषयी मुकुंदवाडी पोलिस, गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांना कल्पनादेखील होती, तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून हे सुरू होते, असेही आता समोर येत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी यात दोन महिलांसह सुनील रामभाऊ डुकळे (वय ४०), सुभाष रामभाऊ गायकवाड (३२) यांच्यावर गुन्हे दाखल करून हजारोंच्या मुद्देमालासह दुचाकी जप्त केल्या.

शनिवारी लोकमतने ''ही तर बालगुन्हेगारांची फॅक्टरी'' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पत्त्यांच्या व्यवसायातील लाखो रुपयांचा काळा बाजार उघडकीस आणला. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी याची गंभीर दखल घेत सकाळीच वसाहतीत छापा टाकत झाडाझडती घेतली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना जाग आली. लोहिया यांच्या कडक भूमिकेमुळे इतर ठाणे सतर्क झाले. अनेक अवैध व्यावसायिकांना ''आहे ते तत्काळ बंद करा'', असा संदेश पोहोचवला गेला आणि सर्वांचेच धाबे दणाणले.

मुकुंदवाडी पोलिस बाजूला
धडाकेबाज कारवाईनंतर आयुक्तांनी मुकुंदवाडीचे निरीक्षक विठ्ठल ससे यांची नियंत्रण कक्षात बदली करत शिवाजी तावरे यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे डुकळे आणि गायकवाड या दोघांवर जवळपास प्रत्येकी दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठांनी मुकुंदवाडी पोलिस, डीबी पथकाला बाजूला ठेवत जवाहरनगर सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांना कारवाईच्या सूचना करून त्यांच्याच फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

अनेक घर, अड्ड्यांना कुलूप
शहराच्या विविध भागातून पैशांच्या हव्यासापोटी तरुण या ठिकाणी येऊन पैसे गमावून बसायचे. सायंकाळी सहानंतर येथे जत्रा भरायची. लाखो रुपयांची उलाढाल वाढल्यानंतर लहान मुलांना यात उतरवले गेले. कारवाईनंतर मात्र मुकुंदवाडीतील अनेक कुटुंबे घर, अड्ड्यांना कुलूप लावून पसार झाले. पोलिसांचीदेखील गस्त सुरू झाली. दीड महिन्यापूर्वीच गुन्हे शाखेचा एक कर्मचारी येथे गेला होता. परंतु, काही महिलांनी त्याला घेराव घालत धिंगाणा सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्याने काढता पाय घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Many contractors underground by locking up gambling dens; The police had an idea about the use of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.