चाचणीचे गुण उशिरा पाठविल्याने अनेकजण नापास; महाविद्यालयांच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:06 PM2018-08-28T16:06:52+5:302018-08-28T16:08:56+5:30
महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत चाचणीचे प्रतिविषय २० गुण निर्धारित वेळेत पाठविले नाहीत. त्यामुळे निकाल जाहीर होताच अंतर्गत चाचणीच्या रकान्यात अनुपस्थिती दर्शविली. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले. या विद्यार्थ्यांचे उशिराने दाखल केलेले गुण ग्राह्य धरता येत नसल्याचा दावा परीक्षा विभागाने केला आहे.
विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांना चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम लागू केलेली आहे. यानुसार एकदा निकाल जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येत नाही. मात्र अनेक महाविद्यालयांनी दिरंगाई करून प्रत्येक विषयासाठी असलेल्या अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण विद्यार्थ्यांना दिलेच नाहीत. चाचणी परीक्षा घेऊनही वेळेत परीक्षा विभागाकडे गुण पाठविण्यात आले नाहीत. याचा परिणाम संलग्न महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना नापास झाले आहेत. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना या २० गुणांपैकी एकही मार्क मिळालेला नसल्यामुळे त्यांचा ग्रेड कमी झाला आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीममध्ये निकाल रिवाईज करण्याची तरतूदच नसल्याचे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. याविषयी वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्यांनी कुलगुरू, परीक्षा संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर कोणीही गांभीर्याने विचार केला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
परीक्षा विभागानेच लावली सवय
पदव्युत्तर अभ्यासक्रमांना तीन वर्षांपूर्वीच सीबीसीए सिस्टीम लागू केलेली आहे. दोन वर्षांपर्यंत परीक्षा विभाग अंतर्गत गुण महाविद्यालयाने सादर केले नसतील तर संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून मागवून घेत असे. महाविद्यालयांनी उशिरा दिलेला गुणांचा अहवाल स्वीकारण्यात येत होता. मात्र या सत्रापासून अचानक हे सर्व बंद करून निकाल जाहीर केले आहेत. तसेच उशिराने दाखल केलेले गुण नाकारले आहेत. या गुणांचा सर्वाधिक फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसत आहे.
प्रशासनाने तोडगा काढावा
विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना, त्यांनी नियमितपणे अंतर्गत चाचणी परीक्षा दिलेली असताना त्यांना गुण नाकारण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. यावर विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून तोडगा काढवा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अमोल दांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस