परदेशवाडी तलावात अनेक मासे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:17+5:302021-04-15T04:04:17+5:30
:पावसाच्या पाण्या बरोबर घातक सांडपाणी सोडल्याचा संशय पावसाच्या पाण्याबरोबर घातक सांडपाणी सोडल्याचा संशय लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : ...
:पावसाच्या पाण्या बरोबर घातक सांडपाणी सोडल्याचा संशय
पावसाच्या पाण्याबरोबर घातक सांडपाणी सोडल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या परदेशवाडी पाझर तलावात अनेक मासे मृत झाल्याचे बुधवारी (दि. १४) या परिसरातील शेतकरी व पशुपालकांना दिसले. उद्योग नगरीतील कंपन्यांचे घातक सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर सोडल्याने या तलावातील मासे तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याचा संशय वर्तवला जात आहे.
वाळूज उद्योग नगरीतील अनेक कंपन्या परदेशवाडी तलावात चोरी-छुपे घातक सांडपाणी सोडतात. या घातक रसायनयुक्त सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले असून, जमीन नापिक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनासाठी या तलावातील पाण्याचा वापर थांबवला आहे. बुधवारी सकाळी या तलावात अनेक मासे मृत्यूमुखी पडल्याचे या परिसरातील शेतकरी व पशुपालकांना दिसले. या तलावात पावसाळ्यात सर्रासपणे काही कंपन्याचे दूषित पाणी सोडले जात असल्याने तलावातील पाण्याचा रंगही बदलला असून, तेलाचे थर पाण्यावर तरंगत असतात. या दूषित तलावातील पाणी प्यायल्यामुळे यापूर्वीही अनेक जनावरे दगावली असून, मासेही अनेकदा मृत्यूमुखी पडले आहेत. मंगळवारी (दि. १३) वाळूज महानगर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस पडला होता. या पावसाच्या पाण्याबरोबरच कंपन्यांचे दूषित सांडपाणी तलावात सोडल्याचा संशय शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
परदेशवाडी पाझर तलावात दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याने हा तलाव प्रदूषित झाला आहे. जनावरे व मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर सोपस्कार म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तलावाची पाहणी करुन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन जातात. मात्र, तलावात दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई केली जात नसल्याने या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
फोटो ओळ - परदेशवाडी तलावातील अनेक मासे मृत झाले असून, या तलावात घातक सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फोटो क्रमांक- मासे/ तलाव
------------------