आयटीआयच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य मार्क !
By Admin | Published: January 20, 2017 12:14 AM2017-01-20T00:14:43+5:302017-01-20T00:16:09+5:30
लातूर : जेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून परीक्षेपूर्वी आॅनलाईन अटेन्डन्स पाठविली जाते. ही हजेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत. परिणामी, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, राज्य कार्यालय आणि दिल्ली येथील कार्यालयाकडे हजेरी दुरुस्ती करण्यासाठी लातूर आयटीआयमधून काही कर्मचारी गेले असल्याचे समजते.
लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलंगा, औसा, जळकोट, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर, अहमदपूर या दहाही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय महाविद्यालये आहेत. चार सेमिस्टरचे अनेक शैक्षणिक कोर्स या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना शिकविले जातात. लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५५० विद्यार्थ्यांचा विविध कोर्सेसला प्रवेश आहे. परीक्षेपूर्वी आॅनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयाकडे हजेरी पाठविली जाते. पहिल्या सेमिस्टरची हजेरी पाठविताना दुसऱ्या सेमिस्टरची हजेरी राहिली, तर सॉफ्टवेअरमध्ये ती अपलोड होत नाही. असाच तांत्रिक घोळ विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्समध्ये झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रावर ‘शून्य’ मार्क आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले असून, त्यांनी प्राचार्यांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, प्राचार्यांनी राज्य कार्यालयाकडे संपर्क साधला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे. ४ जानेवारीला या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला असून, १४ जानेवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे. या मुदतीत निकाल न आल्याने विद्यार्थ्यांना परत परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत.(प्रतिनिधी)