चणे आहेत, पण दात नाहीत! गेट अभावी अनेक कोल्हापुरी बंधारे राहणार कोरडेठाक
By विजय सरवदे | Published: September 26, 2022 08:15 PM2022-09-26T20:15:32+5:302022-09-26T20:15:55+5:30
पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते.
औरंगाबाद : रबीचे क्षेत्र वाढावे म्हणून जि. प. च्या सिंचन विभागाने जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे उभारलेले आहेत. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटच नसल्यामुळे यंदाही त्यातील पाणी अडवण्यास अडचण येणार आहे.
साधारपणे १९८८ पासून जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्थात साधारपणे ऑक्टोबरच्या मध्यानंतर कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाते. मात्र, अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे हे पाणी वाहून जाण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. जर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि गेट उपलब्ध झाल्यास सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकतो आणि साधारणपणे ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.
बंधाऱ्यांचे गेट गेले कुठे?
कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्याच्या तक्रारी मागील १५ ते २० वर्षांपासून सुरू आहेत. बंधाऱ्यांचे गेट नेमके गेले कुठे, बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मात्र, जि. प. सिंचन विभागाने यासंदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, १०-१५ वर्षांपूर्वी काही गेट चोरीला गेले. त्यासंदर्भात गुन्हेही दाखल झाले. काही गेट पावसाळ्यात वाहून गेले. काही वाळूत बुजून गेले. पाण्यामुळे अनेक गेट कुजले. त्यामुळे आजघडीला १०३ बंधाऱ्यांसाठी ३०१३ गेटची आवश्यकता आहे.
गेट खरेदीचा प्रश्न अडला कुठे?
काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या उपकर आणि जलयुक्त अभियानातून ४ हजार गेटची खरेदी करण्यात आली. तरही आणखी ३०१३ गेटची आवश्यकता आहे. यासाठी सिंचन विभागाने ३ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला. पण ऐनवेळी राज्यात सत्ता बदल झाला आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकच आतापर्यंत झाली नाही. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात मागण्यात आलेला निधी पुनर्विनियोजनामध्ये मिळेल, अशी अपेक्षा सिंचन विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबरमध्ये पुनर्विनियोजनामध्ये निधी मंजूर होईल. त्यानंतर खर्चाची मंजुरी मिळेल व तेथून पुढे गेट खरेदीची प्रक्रिया सुरू होईल. अर्थात, यंदाही किमान १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडवता येणार नाही.
पाणी अडविण्याचे नियोजन काय?
जिल्ह्यातील १०३ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेटची आवश्यकता आहे. या बंधाऱ्यांपैकी काहींना ५, १०, १२ अशी गेटची गरज आहे. सर्वच बंधारे सताड उघडे आहेत असे नाही. त्यामुळे यंदा किमान ४०० बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविले जाईल व ६ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, असे अधिकारी सांगतात.
बंधाऱ्यांची स्थिती :
- ५८५ कोल्हापुरी बंधारे
- ५१६ बंधारे सुस्थितीत
- १०३ बंधाऱ्यांना हवेत गेट
- १५ हजार गेट जि.प.कडे आहेत
- ३०१३ गेटची गरज
- ३ कोटी ७६ लाखांच्या निधीची मागणी
-४०० बंधाऱ्यांत पाणी अडविण्याचे नियोजन
२५ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज