शहरात मध्ययुगीन कालखंडाचे अनेक बाथरूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:04 AM2021-09-25T04:04:17+5:302021-09-25T04:04:17+5:30
औरंगाबाद : पुरातत्त्व विभागाने मागील काही दिवसांपासून मकबरा परिसरात खोदकाम सुरू केले. गुरुवारी या खोदकामात मध्ययुगीन बाथरूम आढळून आले. ...
औरंगाबाद : पुरातत्त्व विभागाने मागील काही दिवसांपासून मकबरा परिसरात खोदकाम सुरू केले. गुरुवारी या खोदकामात मध्ययुगीन बाथरूम आढळून आले. शहर आणि परिसरात मध्ययुगीन कालखंडापूर्वीचे आणि नंतरचे अनेक बाथरूम उपलब्ध आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती कधीच पुरातत्त्व विभागाने केली नाही. आता उत्खनन करून आणखी एक बाथरूम सापडले. याकडे भविष्यात गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे का, असा प्रश्न ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी उपस्थित केला.
मकबरा उभारण्यापूर्वी या भागात नागरी वसाहत होती. काही मोठमोठी घरे होती. महाल होते. अनेक वर्षे मकबऱ्याचे काम सुरू होते. या कामासाठी नेमलेले कारागीर याच भागात घरे बांधून राहत असत. त्या काळात प्रत्येक बांधकाम चुन्यातच केले जात होते. दगड मोठ्या प्रमाणात होते. दगडांना आकार देण्यात हे कारागीर निपुण होते. त्यांनी त्या काळात सुंदर बाथरूम उभारलेले होते. त्यात नवल काहीच नाही. दौलताबाद येथे मध्ययुगीन कालखंडापूर्वीचे म्हणजेच इ.स. १३२५ च्या आसपासचे बाथरूम आजही उपलब्ध आहे. पुरातत्त्व विभाग त्याचे संरक्षण का करीत नाही. मौलाना आझाद कॉलनीत, शहानूर मियाँ दर्गा परिसरात अशा पद्धतीचे बाथरूम जमिनीवर उपलब्ध आहेत. हा वारसा जपण्याचे काम पुरातत्त्व विभागाचेच आहे. मकबरा परिसरात खोदकाम करून निव्वळ पैसा वाया घालविण्यात येत आहे, असेही डॉ. रमजान यांनी सांगितले.
इतिहासतज्ज्ञ दुलारी कुरेशी म्हणाल्या की, मकबरा परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. त्यांना बाथरूम आणि इतर अवशेष सापडले. याची मी पाहणी केलेली नाही. दोन दिवसानंतर पाहणी करणार आहे. पाहणीनंतरच यावर अधिक भाष्य करणे योग्य राहील.