अनेकांना गंडवीत होती सोनवतीची टोळी
By Admin | Published: February 21, 2017 10:28 PM2017-02-21T22:28:04+5:302017-02-21T22:31:40+5:30
लातूर : सोनवतीच्या टोळीकडून बनावट सोने देऊन अस्सल सोन्याला गंडविल्याच्या घटना आता पुढे आल्या आहेत.
लातूर : लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दरोडे, फसवणूक आणि लुटालुटीच्या घटना घडत आहेत. दुप्पट सोने देण्याचे आमिषाला अनेकजण बळी पडल्याच्या घटना घडल्या असून, सोनवतीच्या टोळीकडून बनावट सोने देऊन अस्सल सोन्याला गंडविल्याच्या घटना आता पुढे आल्या आहेत. सध्या या टोळीतील तिघे पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, चौकशीत या तिघांनीही दुप्पट सोने देऊन फसवणूक केल्याचे कबूल केले आहे.
लातूर तालुक्यातील सोनवती गावच्या पाच जणांची ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात अनेकांना गंडवीत होती. वेळप्रसंगी चाकूचा धाक दाखवून लुटतही होती. दरोडा टाकण्याची तयारीही त्यांनी केली होती. यासाठी गुळ मार्केट परिसरातील राष्ट्रीय गुमास्ता मंडळ कार्यालयाच्या शेजारील संरक्षक भिंतीलगत पाच जणांची टोळी दबा धरून बसली होती. या टोळीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सोनवतीच्या टोळीतील परमेश्वर राजेंद्र गायकवाड (२३), नितीन शिवाजी जाधव (२७) आणि पांडुरंग तुकाराम जाधव (२२) या तिघांना अटक केली. उर्वरित दोघे सराईत गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. आपण लातूर शहरासह जिल्ह्यात केलेल्या गंभीर गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे. विशेष म्हणजे लोखंडाला सोनेरी पॉलिश देऊन ते अस्सल असल्याचे भासवत अनेक महिलांना लुबाडण्याचा या टोळीचा उद्योग आहे. कव्हा नाका परिसरातील एका महिलेलाही गेल्या महिनाभरापूर्वी दुप्पट सोने देण्याचे आमिष दाखवून गंडविल्याची घटना घडली होती. (प्रतिनिधी)