अशोक विजयादशमीनिमित्त बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:22 IST2018-10-18T12:54:04+5:302018-10-18T13:22:23+5:30
अशोक विजयादशमीनिमित्त आज (दि.१८) बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अशोक विजयादशमीनिमित्त बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रम
औरंगाबाद : अशोक विजयादशमीनिमित्त आज (दि.१८) बुद्धलेणीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यात परित्राणपाठ, ध्वजारोहण, मंगलमैत्री, धम्मदेसनासह सायंकाळी चार वाजता शहरातील मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाची बुद्धलेणीवर जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्धलेणी धम्मभूमीवर ६३ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी शहरातील शासकीय, राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. विजयादशमी महोत्सवाचे अध्यक्ष विशुद्धानंद बोधी महाथेरो, तर प्रमुख अतिथी म्हणून सूर्यकांता गाडे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँकेचे संचालक तथा आरपीआयचे शहराध्यक्ष विजय मगरे, तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून अॅड. डी. व्ही. खिल्लारे आहेत.
विजयादशमीदिनी पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत परित्राणपाठ, ७ वाजता धम्मध्वजारोहण, ८ वाजता भिक्खू संघाकडून परित्राणपाठ, ११ वाजता भिक्खू संघाला भोजनदान, दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी १२ ते ३ या दरम्यान प्रवचन व भीमगीतांचा कार्यक्रम, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत व भाषणे होतील. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजता राजाभाऊ सिरसाठ आणि पंचशीला भालेराव यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम व भिक्खंूचे प्रवचन होणार आहे. बुद्धलेणीच्या धम्मभूमीत येणारे उपासक आणि उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवाला भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त नागसेन बोधी थेरो, भदन्त चंद्रबोधी, भदन्त संघप्रिय, भदन्त शीलबोधी, भदन्त पद्मपाणी, भदन्त आर. आनंद, भदन्त विमल कीर्ती, भदन्त संबोधी, भदन्त सुमनश्री, भदन्त उपाली, भदन्त महानामस आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बौद्ध उपासक -उपासिकांसाठी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त, बससेवा, पाण्याची व्यवस्था, तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन केले आहे.