अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच
By Admin | Published: November 18, 2014 12:59 AM2014-11-18T00:59:38+5:302014-11-18T01:08:58+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिपाची पिके हातची गेली आहेत. पावसाळा संपला तरी अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच राहिले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम साठा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे.
मराठवाड्यात सर्व प्रकारचे एकूण ८३३ प्रकल्प असून, त्यांच्या पाणीसाठ्याची क्षमता ७९११ द.ल.घ.मी. आहे; मात्र सध्या या प्रकल्पांमध्ये ३४ टक्के म्हणजे २६७३ द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा आहे.
लघु, मध्यम, मोठे, तसेच मांजरा आणि गोदावरी नदीवरील बंधारे या सर्वांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.
११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३९ टक्के साठा आहे. यातील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ३१ टक्के पाणीसाठा आहे, तर मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे तीन प्रकल्प कोरडेच आहेत.
माजलगाव प्रकल्पातही अवघा २ टक्के साठा शिल्लक आहे. येलदरी धरणात ५० टक्के, विष्णुपुरी धरणात ६७ टक्के आणि सिद्धेश्वर धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही २८ टक्केच साठा आहे. परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वात कमी १९ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ४२ टक्के इतका जलसाठा आहे. यंदा मराठवाड्यातील ७२० लघु प्रकल्पांमध्येही जेमतेम २८ टक्के साठा होऊ शकला आहे.