मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 03:38 PM2021-11-23T15:38:29+5:302021-11-23T15:40:55+5:30
गर्दीत विनामास्क बिनधास्त वावर, हे वागणे कोरोना वाढीला हातभार लावण्याची भीती
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तलावर टांगलेली असूनही मास्कचा वापर प्रचंड कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी मास्क तोंडावरून हनुवटीवर, मानेखाली आला होता (Many reasons not to use a mask). आता तर मास्क खिशात अथवा घरीच ठेवून नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मास्क नसल्यावरून काहींना हटकल्यावर ‘सारखं थुंकावं लागतं’, ‘मेकअप केलेला आहे’, ‘खिशातच आहे ना मास्क’ अशी उत्तरे मिळाली.
शहरात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगलाही फाटा दिला जात आहे. हे वागणे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढीला हातभार लावू शकते. संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर कराच, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात
क्रांती चौक
क्रांती चौकातील वाहतूक सिग्नलवर १० वाहनचालकांपैकी ७ वाहनचालक विनामास्क, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. चौकात रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबलेले अनेक जण विनामास्क होते. गप्पा मारत बसलेले युवकही विनामास्क होते.
पैठण गेट
रस्त्याने ये-जा करणाऱ्यांंमध्ये विनामास्क असलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. या रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक दुचाकीधारकही विनामास्क पाहायला मिळाले. गर्दीचा परिसर असताना विनामास्क फिरताना नागरिकांना कोणतीही चिंता वाटत नव्हती.
गुलमंडी
जणू कोरोना संपला, अशीच स्थिती पाहायला मिळाली. एखाद्या दुकानात विनामास्क प्रवेश करताना ग्राहकांना कोणीही अडवत नव्हते. ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तेही फक्त बघ्याची भूमिका घेत होते.
मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?
मास्क घरी राहिला
मी रोज मास्क वापरतो. परंतु आज गडबडीत घरीच राहिला. मास्कअभावी दंड होतो, हे मला माहीत आहे. पण लगेच रुमाल बांधतो.
- एक तरुण, क्रांती चौक
तंबाखू खाल्ला म्हणून...
थोड्या वेळापूर्वीच तंबाखू खाल्ला. थुंकण्यासाठी मास्क काढून खिशात ठेवला. नेहमीच मास्क वापरतो.
- एक ज्येष्ठ, गुलमंडी
मास्कला लिपस्टिक लागते
खरेदीसाठी जायचे म्हणून मेकअप केला. मास्कला लिपस्टिक लागू नये, म्हणून मास्क घातला नाही. पण जवळ मास्क आहे.
- एक तरुणी, पैठण गेट
मास्क नसेल तर ५०० रुपये दंड
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून नागरी मित्र पथकामार्फत या आठवड्यात २८ हजारांचा दंड वसूल केला गेला. मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.