अनेक शाळांत खिचडी शिजेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:25 AM2017-11-13T00:25:48+5:302017-11-13T00:25:58+5:30
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दिवाळीच्या सुट्या संपवून आठवडा उलटला तरी अनेक शाळांमध्ये शिजलेलीच नाही. दिवाळीच्या सुट्यांपूर्वी संपलेल्या तांदळाचा पुरवठाच न झाल्यामुळे अनेक शाळांमधील खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी घरी जावे लागत आहे.
जिल्ह्यातील जि. प.च्या व अनुदानित १६०० शाळांमधील एक ते सातवीच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडीचे वाटप केले जाते.
विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, तसेच शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. असे असेल तरी मध्यान्ह भोजन योजना वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. सध्या जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खिचडी गत आठवडाभरापासून बंद आहे. दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमधील तांदूळ व दाळ, मटकीचा साठा संपला. दिवाळीच्या सुट्या संपण्यापूर्वी यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमध्ये तांदूळ व अन्य साहित्य पुरविणे गरजेचे असताना, बहुतांश शाळांमध्ये तांदूळच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या तांदळाचा साठा आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात येत आहे.
मात्र, साहित्य संपलेल्या जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी बंद आहे. जालना शहरातील काही शाळांचा यात समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही काहीसा परिणाम होत आहे.