दिव्यांग बालकांचे अनेक प्रश्न अनुत्तरित
By | Published: December 8, 2020 04:01 AM2020-12-08T04:01:03+5:302020-12-08T04:01:03+5:30
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दि. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेतर्फे ...
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दि. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेतर्फे तीन दिवसीय वेबिनार घेण्यात आले.
पहिल्या सत्रात पुणे येथील माधुरी देशपांडे यांनी दैनंदिन व्यवहारात मुलांना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, हे सांगितले. दुसऱ्या सत्रात ज्योती इरावले यांनी पालकांशी संवाद साधला. दिव्यांग मुलांसाठी असणारा ५ टक्के निधी मिळावा आणि दिव्यांग मुलांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, तसेच दिव्यांगांसाठी फक्त कागदावर असणाऱ्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मुलांना मिळावा, यासाठी पालकांनी पाठपुरावा करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तिसऱ्या सत्रात रजनी पटवारी यांनी विशेष मुलांवर होणारा औषधाचा परिणाम हा महत्त्वपूर्ण विषय समजावून सांगितला. विशेष मुलांना सगळे अधिकार आहेत. फक्त ते मिळविण्यासाठी लढा देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाला औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे शाळेच्या संचालिका आदिती शार्दूल यांनी सांगितले.