चोरांच्या धास्तीने जागताहेत अनेक गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:39 AM2018-06-13T00:39:00+5:302018-06-13T00:39:20+5:30

चोरांच्या धास्तीने गेल्या दहा दिवसांपासून वेरूळ, कसाबखेडा शिवारातील तलाववाडी, मंबापूरवाडी, मलकापूर परिसरातील शेतवस्तीत राहणाऱ्या लोकांची रात्रीची झोप उडाली आहे. रात्रभर जागून चोरांपासून संरक्षण करण्यासाठी गावातील तरुण हातात लाठ्याकाठ्या, बॅटरी घेऊन गावात खडा पहारा देत आहेत. रात्रीची झोप नसल्याने अनेकांचे डोळे लाल होऊन सुजले आहेत. एवढे करूनही कुठे चोर सापडले नसल्याने केवळ अफवांचेच पीक जोरात आहे.

 Many villages are awaiting thieves | चोरांच्या धास्तीने जागताहेत अनेक गावे

चोरांच्या धास्तीने जागताहेत अनेक गावे

googlenewsNext

सुनील घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : चोरांच्या धास्तीने गेल्या दहा दिवसांपासून वेरूळ, कसाबखेडा शिवारातील तलाववाडी, मंबापूरवाडी, मलकापूर परिसरातील शेतवस्तीत राहणाऱ्या लोकांची रात्रीची झोप उडाली आहे. रात्रभर जागून चोरांपासून संरक्षण करण्यासाठी गावातील तरुण हातात लाठ्याकाठ्या, बॅटरी घेऊन गावात खडा पहारा देत आहेत. रात्रीची झोप नसल्याने अनेकांचे डोळे लाल होऊन सुजले आहेत. एवढे करूनही कुठे चोर सापडले नसल्याने केवळ अफवांचेच पीक जोरात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाभरात चोरांच्या अफवा व काही सत्य घटना घडल्याने खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, कसाबखेडा परिसरातही दहा दिवसांपासून चोर आले, चोर आले म्हणून लोक जागरण करीत आहेत.
शेतवस्तीवरील शेतकरी आजूबाजूच्या सर्व महिला व मुलांना एकाच्या घरी झोपी घालून रात्री या घराभोवती खडा पहारा देत आहेत. इकडे चोर आले, तिकडे चोर आले, कुणी चार बघितले, कुणी दोन बघितले, इकडे पळाले, तिकडे पळाले, शेजारच्या गावात एकाला उचलून नेऊन मारले, याला चाकू मारला, रात्री साडेसात-आठनंतर लोक बॅटºया हातात घेऊन जमा होतात. पोलीस प्रशासनाने मार्गदर्शन करूनही गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पोलिसांंवरही या ग्रामस्थांचा विश्वास नसल्याचे सदर प्रतिनिधीने दिलेल्या भेटीत दिसून आले. खुलताबाद तालुक्यातील तलाववाडी शिवारातील शेतवस्तीवर फेरफटका मारला असता वस्तीवर दिवसभर याच विषयावरील गप्पा आबालवृद्धांमध्ये ऐकायला मिळाल्या. धनसिंग गुंडीराम गुमलाडू यांच्या राहत्या वस्तीवर जाऊन त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, आम्ही दररोज रात्री परिसरातील सर्व महिला व मुलांना एकत्रित करून एकाच्या घरी झोपी घालतो. यानंतर आम्ही व तरुण रात्रभर जागून खडा पहारा देतो. चोरांच्या धास्तीमुळे वाड्या-वस्तीवरील लोक खूपच हैराण झाले आहेत. चोरांपासून संरक्षण करण्यासाठी रात्री जागरण व दिवसा झोप अशी आमची दिनचर्याच बनली असल्याचे ते म्हणाले. धनसिंग गुमलाड सोमवारी वेरूळ येथील पोलीस प्रशासनाच्या बैठकीतही गेले होते. पोलीस म्हणतात चोर आहे की नाही त्याची शहानिशा करा, मग आम्हाला कॉल करा, तोपर्यंत आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याच परिसरात राहणारे मच्छिंद्र अभिमान माळी म्हणाले, चोरांच्या भीतीपोटी रात्री जागरण केल्याने डोळे लाल झाले व सुजल्याने त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील काही लोक महिला व मुलांना घराच्या छतावर व पत्रावरही झोपण्यासाठी पाठवत आहेत. चोर खरच आहेत का, असे विचारले असता माळी म्हणाले, चोर येतात पण सापडत नाहीत.
शेतीची कामे रखडली
प्रेमसिंग गुमलाडू, आकाश गुमलाडू, विजय बमनावत यांनी चोरांमुळे सर्व शेतीची कामे रखडले असल्याचे सांगितले. मंबापूरवाडी येथील अंबरसिंग जंघाळे व दशाबाई जंघाळे या शेतवस्तीवरील पती-पत्नीची भेट घेतली असता त्यांनी दहा दिवसांपासून रात्रभर जागून डोळे बारीक पडल्याचे सांगितले. रात्री परिसरात चोर आल्याचेही त्यांनी सांगितले; परंतु लोक त्यांच्यापर्यंत पोहोण्यापूर्वीच ते फरार झाल्याचे सांगितले.
बालचंद उत्तम जंघाळे यांनी चोराच्या धाकाने दहा दिवसांपासून गाव सोडता आले नसल्याचे सांगितले.
मंबापूरवाडी परिसरातील झणक परदेशी, साहेबसिंग जंघाळे, प्रताप जंघाळे यांनीही सर्व लोक रात्री एकत्र येऊन पहारा देत असल्याचे सांगितले.
मलकापूर परिसरातही अशीच काही परिस्थिती असून लोक एकत्र येऊन ‘जागते रहो’चा नारा देत आहेत.
कसाबखेडा परिसरातील शेतवस्तीवर सुद्धा अशीच परिस्थिती असल्याचे कसाबखेडा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तनवीर पटेल यांनी सांगितले. तनवीर पटेल हेही शेतवस्तीवर राहत असून, ते स्वत: १५ ते २० युवक सोबत घेऊन रात्री जागून पहारा देत आहेत. दररोज रात्री पोलिसांची गाडीही चक्कर मारून जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रा.पं. सदस्य सुनील औटे पाटील म्हणाले, कसाबखेडा, पोटूळ, पाचपीरवाडी परिसरातील लोकांत चोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कसाबखेडा परिसरातील रुताडी वस्ती, आई भवानी माता मंदिर परिसरात चोर आल्याचे त्यांनी सांगितले. वेरूळचे माजी सरपंच साहेबराव पांडव यांच्या शेतवस्तीवर चोर आल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर वेरूळ परिसरात सुरू होती. साहेबराव पांडव यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, चोर नव्हते, रात्री मुले ढाब्यावरून ओली पार्टी करून धिंगाणा घालत जात होते. त्यामुळे अफवा कशा पसरल्या जात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
पोलिसांनी समुपदेशन करूनही उपयोग नाही
पोलिसांनी समुपदेशन करूनही लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. लोकांच्या तावडीत जर रात्री-बेरात्री कुणी सापडला तर वैजापूर तालुक्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत पोलिसांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांशी मनमोकळ्या चर्चा करून त्यांना धीर देण्याची गरज आहे.

Web Title:  Many villages are awaiting thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.