जिल्हा रुग्णालयातील अनेक कक्ष कुलूपबंदच; रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:43 PM2022-04-06T19:43:07+5:302022-04-06T19:43:23+5:30

घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे ठरत आहे.

Many wards in the district hospital are locked; Waiting for the hospital to start at full capacity | जिल्हा रुग्णालयातील अनेक कक्ष कुलूपबंदच; रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच

जिल्हा रुग्णालयातील अनेक कक्ष कुलूपबंदच; रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कुठे कक्षाच्या कडी-कोंड्याला कुलूप लावलेले आहे, तर कुठे साखळी लावून कक्ष कुलूपबंद करण्यात आलेला आहे. ही स्थिती एखाद्या कारागृहातील नाही तर चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. रुग्णालयातील अनेक विभाग, कक्ष कुलूपबंद असून, काही विभाग केवळ नावालाच उरलेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभे राहिलेले रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा भार कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे ठरत आहे. आजघडीला येथील प्रसूती विभाग, बालरोग विभाग, अस्थिव्यंगोपचार विभाग, सर्जरी विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. ओपीडी सेवाही दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु येथील अनेक विभाग अद्यापही कागदावर आहेच. त्यासाठी रुग्णालयांना घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालये अथवा खासगी रुग्णालयच गाठावे लागत आहे.

किमोथेरपी सेंटर नावाच
जिल्हा रुग्णालयात किमोथेरपी सेंटर साकारण्यात आले. परंतु आजघडीला हे सेंटर नावालाच आहे. हे सेंटरही सध्या कुलूपबंद असल्याचे पहायला मिळाले. रुग्णांना शासकीय कर्करोग रुग्णालयाचाच मोठा आधार मिळत आहे.

डायलिसिस विभागाची प्रतीक्षाच
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी डायलिसिस महत्त्वपूर्ण ठरते. आजघडीला गोरगरीब रुग्णांना घाटी रुग्णालयाचाच यासाठी आधार मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभागाच्या नावाची केवळ पाटीच आहे. या विभागाला मान्यता मिळाली असून, लवकरच ते सुरू होईल, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ म्हणाल्या.

कुलूपबंद असलेले विभाग
दुसऱ्या मजल्यावरील नेत्ररोग शस्त्रक्रिया विभाग, डायलिसिस विभाग, डे केअर सेंटर, योग साधना कक्ष, ई.सी.टी, ई.ई.जी. सध्या कुलूपबंद आहे. यासह इतर कक्षही बंद असल्याचे पाहायला मिळाले. रक्तपेढी सुरू होण्याचीही याठिकाणी प्रतीक्षा करावी लागत आहे.

कैदी कक्ष की भांडारगृह?
जिल्हा रुग्णालयात कैद्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे. कारागृहाप्रमाणे रचना असलेल्या या कक्षात ६ कैद्यांवर उपचार करण्याची सुविधा आहे. परंतु आजघडीला या कक्षाला भांडारगृहाचे स्वरूप देण्यात आले. कैद्यांवर उपचाराची जबाबदारी केवळ घाटी रुग्णालयाला पार पाडावी लागत आहे.

अनेक विभाग सुरू
रुग्णालयातील बहुतांश विभाग सुरू झालेले आहेत. सर्जरी, प्रसूती, बालरोग, अस्थिरोग इ. विभाग सुरू आहेत. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आमखास मैदानासमोरील नेत्रविभागात होतात.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Many wards in the district hospital are locked; Waiting for the hospital to start at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.