अनेक वर्षे कुस रिकामी, टोमणेही नकोसे, पण एकाच दिवशी ५ महिलांना मातृत्त्वाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:03 AM2021-04-15T04:03:57+5:302021-04-15T04:03:57+5:30
औरंगाबाद : लग्न झाले, त्यानंतर एक, एक वर्षे सरत गेले. वयाची ४० वर्षे लोटली, पण आई होण्याचे सुख मिळाले ...
औरंगाबाद : लग्न झाले, त्यानंतर एक, एक वर्षे सरत गेले. वयाची ४० वर्षे लोटली, पण आई होण्याचे सुख मिळाले नाही. वांझपणाचा बसलेला शिक्का. घरातील लोकांसह समाजातून मिळणारे टोमणे नकोसे झाले. निसर्गाने दिले नाही, पण अखेर वैद्यकीय तंत्रज्ञानाने ‘त्यांना’ मातृत्त्वाचे सुख दिले. हे तंत्र म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ने ५ महिलांना एकाच दिवशी मातृत्त्वाचा आनंद दिला. यात दोन महिलांनी जुळ्यांना जन्म दिला. या तंत्राने एकाच दिवशी ७ बाळांचा जन्म झाल्याने आरोग्य क्षेत्रात औरंगाबादला आणखी एक वेगळी ओळख मिळाली.
करिअरच्या मागे धावणाऱ्या तरुणींसह महिलांमध्ये अनेक कारणांनी दिवसेंदिवस वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी बाळासाठी ‘टेस्ट ट्यूब बेबी’च्या पर्यायाचा स्वीकार केला जात आहे. ‘करिअर घडविताना उशिरा झालेले लग्न, त्यामुळे तिशीनंतर गर्भधारणा होण्यास अडथळे येतात. महिलांना आई होण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा पर्याय सांगण्यात येतो. औरंगाबादेत या उपचार पद्धतीने आजवर अनेकांना मातृत्व दिले आहे. पण ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या प्रकियेद्वारे हे गर्भ राहिलेल्या ५ महिलांची एकाच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी, मंगळवारी प्रसुती झाली आणि ७ शिशूंचा जन्म झाला. ही प्रसुती झाली चिकलठाणा येथील एंडोवर्ल्ड हॉस्पिटलमध्ये. या ५ मातांची सिझेरियन प्रसुती झाली. त्यापैकी दोन मातांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. रुग्णालयाचे संचालक डॉ. पंडित पळसकर, डॉ. रिंकू पळसकर, डॉ. अर्चना गडकरी, डॉ. विद्या घळके, डॉ. लक्ष्मीकांत क्षीरसागर, डॉ. शिवाजी साडेकर, डॉ. रिंकू देशपांडे, डॉ. निकिता मानधने या स्त्रीरोगतज्ज्ञांनी आणि डॉ. केदार साळवेश्वरकर, डॉ. रमेश बजाज, डॉ. विनायक मगर, डॉ. श्रीपाद दखने व डॉ. संदीप गाजरे या बालरोगतज्ज्ञांनी या प्रसुतीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
---
४५व्या वर्षी उजवली कुस
औरंगाबाद, परभणी, बुलडाणा येथील प्रत्येकी एक महिला आणि बीड येथील दोन महिलांना टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे अपत्य प्राप्ती झाली. या पाचपैकी एका महिलेचे वय ४५ वर्षे आहे. अधिक वय, गर्भनलिका बंद असणे अशा कारणांनी गर्भधारणा होत नव्हती. २० ते ३५ हे वय गर्भधारणेसाठी योग्य असल्याचे डॉ. पंडित पळसकर यांनी सांगितले.
फोटो ओळ....
शहरात टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे एकाच दिवशी ५ महिलांनी ७ बाळांना जन्म दिला. यात दोघींनी जुळ्यांना जन्म दिला.
डॉ. पंडित पळसकर.