मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च
By बापू सोळुंके | Published: February 17, 2023 02:55 PM2023-02-17T14:55:13+5:302023-02-17T14:56:45+5:30
राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा
औरंगाबाद: मराठा समाजांच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्यावतीने पून्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 28 फेब्रुवारी रोजी कायगाव टोका (ता. गंगापूर)येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून मुंबईतील मंत्रालयावर चार चाकी वाहनांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटिल म्हणाले की, हा लाँग मार्च काय गाव येथून अहमदनगर मार्गे चाकण येथे जाऊन मुक्कामी राहून दुसर्या दिवशी 1 मार्च रोजी मुंबईत पोहोचेल. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल यांनी सहा महिन्यात एकाही बैठक घेतली नाही. मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटिल यांना आस्था नाही, यामुळे त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
मराठा आरक्षण चा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सवलती देण्यात याव्या अशी मागणी समाजाने लावून धरली आहे. मात्र या मागणीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते . समन्वयक रवींद्र काळे पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे घेतलेल्या मेळाव्यातून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. बँका तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत, ही बोंब जग जाहीर असताना या मेळाव्यात किती तरुणांना बँकांनी कर्ज मंजूर केले, याचा जाब अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना आम्ही विचारणार आहोत.
राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा तोपर्यंत राज्यात शासकीय नोकर भरती घेऊ नये अशी आमची मागणी आहे .प्रा. माणिकराव शिंदे म्हणाले की, 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण केंद्र सरकारने जसे मंजूर केले तसेच आरक्षण मराठा समाजाचे मंजूर करावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला भेटणार आहोत. मराठा समाजाचे मत तुम्हाला हवे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण संसदेत मंजूर करावे.