मस्साजोग प्रकरणी बीडच्या मोर्चात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाज सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:47 IST2024-12-27T14:46:48+5:302024-12-27T14:47:17+5:30
या घटनेच्या निषेधार्थ आणि देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मोर्चाचे बीड येथे २८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

मस्साजोग प्रकरणी बीडच्या मोर्चात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाज सहभागी होणार
छत्रपती संभाजीनगर: मस्साजोग(जि.बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी बीड येथे आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे लाखो लोक सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मोर्चाचे बीड येथे २८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक म्हाडा कॉलनीतील जिजाऊ मंदीर येथे पार पडली.
या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, आप्पासाहेब कुढेकर, सुनील कोटकर,रविंद्र काळे, नितीन कदम, राजेंद्र चव्हाण, ॲड. सुवर्णा मोहिते , शारदा शिंदे, अशोक खानापुरे, गणेश उगले, निवृत्ती डक पाटील, राजू कदम, गोपाल चव्हाण,विकीराज पाटील, अशोक वाघ, ज्ञानेश्वर कनके, प्रशांत महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना किशाेर चव्हाण म्हणाले की,मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे करण्यात आली.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असलेल्या वाल्मिक कराड या गुंडाचा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता आहे. या हत्येतील ७ पैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींना अद्याप पकडण्यात आले नाही. संतोष देशमुख हे एक लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या हत्येमुळे सर्व समााजाचे लोक भयभीत आहेत. यामुळे आरोपींना तातडीने अटक करावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी बीड येथे आयोजित मोर्चात जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.