Maratha Kranti Morcha मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 05:32 PM2018-07-23T17:32:38+5:302018-07-23T21:27:56+5:30
मराठा आरक्षणासाठी औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला.
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी औरंगाबद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 28) या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जीव दिला. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करत आंदोलन आणखी तीव्र केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याशिवाय काकासाहेब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी भूमिका येथील मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद - नगर रोडवरील कायगाव येथे गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यांना काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरु करण्यात झाली. प्रथमतः या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. यानंतर आंदोलकांनी गोदावरी नदीवरील पुलाच्या मध्यभागी धाव घेतली.यावेळी त्यांची या ठिकाणी तैनात तैनात पोलिसांसोबत वादावादी झाली. यामुळे एकच गोंधळ उडाला,यातच काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने नदी पात्रात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित जमावाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाहजोरात असल्याने काकासाहेब हे जवळपास 200 मीटर अंतरावर वाहत गेले.
ग्रामरक्षक दलाचे दशरथ बिरुटे यांनी त्याला प्रवाहातून काढून काठावर नेले. यानंतर त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती गंगापूर तालुक्यात वाऱ्यासारखी बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच आंदोलकांनी नगर रोडवर रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. नगर रोडवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी रास्तारोको केले असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
निवेदन देऊन दिला होता इशारा
गंगापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. यात त्यांनी सोमवारी (दि. २३ ) कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.