मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 09:18 AM2021-05-13T09:18:56+5:302021-05-13T09:19:21+5:30
या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली.
औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली आहे.
आरक्षणाचा कायदा मजबूत नव्हता, यामुळे तो टिकला नाही, असे राज्य सरकार म्हणत आहे. तर कायद्याची बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडल्यामुळे आरक्षण रद्द झाले, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. एकमेकांवरील कुरघोडीच्या राजकारणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाचा बळी घेतल्याची चर्चा सध्या मराठा समाजात होत आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. काळे कपडे घालून स्वतःच्या घरावर पाटील यांनी काळा झेंडा लावला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत समाजानेही स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन केले.
घरावर काळे झेंडे लावून करत असलेला हा निषेध न्यायालयाविरोधात नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारने अजूनही काही पर्यायी व्यवस्था केली नाही. कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. मराठा समाजाने स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करावा.
- विनोद पाटील, याचिकाकर्ता.