मराठा क्रांती मोर्चा : मशाल रॅलीतील आंदोलकांनी ठिय्या देताच पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:41 PM2021-02-01T19:41:02+5:302021-02-01T19:44:16+5:30
Maratha Reservation मशाल रॅली येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता क्रांतिचौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे, मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी साष्ट पिंपळगाव (ता.अंबड ) येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या मशाल रॅलीचा समारोप क्रांतीचौकात झाला. यानंतर आंदोलकानी ठिय्या देण्यास सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना अटक केली.
साष्ट पिंपळगाव येथून आलेल्या आंदोलकांचे काही वाहन पोलिसांनी केंब्रिज चौकात अडविल्याचा दावा आंदोलकांनी केला. शहरात चार वाहनांमधून मशाल घेऊन आलेल्या २० आंदोलकांनी क्रांतिचौकात रॅलीचा समारोप केला आणि ठिय्या देण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे यांनी ठिय्या आंदोलनाला परवानगी नसल्याचे यावेळी नमूद केले. यामुळे आंदोलन करू नका, असे सांगितले. मात्र त्यांचे न ऐकता घोषणा सुरूच ठेवल्याने पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आणि क्रांतिचौक ठाण्यात नेले. या आंदोलनात मनीषा मराठे, दिव्या पाटील, सुवर्णा तुपे, कावेरी पावसे, मंगल पंडित, अनिता भोकरे, संजय सावंत, अमोल साळुंके, राहुल भोसले, सुधाकर शिंदे, प्रदीप नवले, गणेश उगले आदींनी सहभाग घेतला.
२० आंदोलक ६० पोलीस
मशाल रॅली येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता क्रांतिचौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र प्रत्यक्षात रॅलीसह केवळ १८ ते २० आंदोलक आले. मात्र तेथे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, विशेष शाखेचे निरीक्षक कटाणे यांच्यासह सात पोलीस अधिकारी, दोन महिला अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी.