मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
By बापू सोळुंके | Published: February 17, 2024 04:08 PM2024-02-17T16:08:12+5:302024-02-17T16:09:18+5:30
शनिवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अजब नगरातील संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सलग तिसऱ्या दिवशी मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शनिवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अजब नगरातील संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे , सगे, सोयऱ्यांचा कायदा करावा या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे. अन्न, पाणी त्याग केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. यामुळे सकल मराठा समाज संतप्त झाला आहे. मराठवाड्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे.
काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस जाळण्यात आल्या तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला .छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. काल शुक्रवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या पुंडलिक नगर येथील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तर आज शनिवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, एक मराठा लाख मराठा, मनोज दादा तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालय परिसर दणाणून सोडला, यावेळी डॉक्टर कराड यांचे पुत्र हर्षवर्धन यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. विजय काकडे गणेश उगले पाटील, अशोक वाघ, परमेश्वर नलावडे, गणेश लोखंडे, कल्पना साखळे, दिपाली बोरसे, ज्योती शिंदे, कल्पना काळे, डाॅ.रंगनाथ काळे, गणेश नखाते, अमोल पाटील, निवृत्ती डक पाटील, रमेश पाटील, सतीश देवखळे, श्रीकांत तौर आदींसह विविध कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.