मंत्री छगन भूजबळ यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने
By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 14:24 IST2023-12-01T14:23:58+5:302023-12-01T14:24:21+5:30
''छगन भूजबळ यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी''

मंत्री छगन भूजबळ यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आणि मराठा आरक्षणाविषयी विषारी टीका करून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी शहरातील क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली.
एक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळ हाय, हाय, छगन भूजबळ यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी भूजबळांच्या प्रतिमा असलेले बॅनर उलटे हातात घेऊन त्याला जोडे मारले. शेवटी हे बॅनर फाडून पायदळी तुडवित त्यांचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे,प्रतिभा जगताप, संध्या जाधव,पद्मा तुपे आणि दिपाली बोरसे, नितीन कदम, सुनील कोटकर, पंढरीनाथ गोडसे पाटील, नीलेश डव्हळे, सुधाकर शिंदे, विजय गायकवाड, सुहास बागल आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.