आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीला धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:14 PM2020-12-30T19:14:57+5:302020-12-30T19:16:22+5:30
Maratha Kranti Morcha : ९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे
औरंगाबाद: घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा लोकसभा हिवाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीला धडकणार असल्याची माहिती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले की , मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तेव्हापासून समाजाचे तरुण हवालदिल झाले आहे. नोकरी आणि शिक्षणाचे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी समाज पुन्हा संघटित झाला आहे. मराठा समाजाला केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तात्काळ पावले उचलावे याकरिता मराठा क्रांती मोर्चा दिल्ली येथे धडकणार आहे. या मोर्चाला जाण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा दिल्लीकरीता रेल्वे गाड्या बुक करणार आहेत. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थगिती पूर्वीच्या नियुक्त्या द्या
९ सप्टेंबर रोजी एसईबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तत्पूर्वी मराठा समाजाच्या ज्या उमेदवारांची शासकीय सेवेसाठी निवड झाली होती त्यांना तातडीने नियुक्तीपत्रे देऊन रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. मराठा विद्यार्थ्याना ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षण सरसकट न देता ऐच्छिक करावे, राज्य सरकारने मॅनेजमेन्ट कोटा म्हणून मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा आणि त्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे. यावेळी अभिजीत देशमुख, सुरेश वाकडे, मनोज गायके,सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मनिषा मराठे आदी उपस्थित होते.
१०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला अडसर ठरत नाही
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्याच्या इतर मागासवर्गीयासाठी आरक्षण देण्याच्या अधिकाराला धक्का लागत नाही. राज्य सरकार स्वतःच्या अधिकारांत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते. यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्रीय मागास आयोगाकडे शिफारसीसह पत्र पाठवून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.