आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांतीमोर्चाचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:24 PM2018-08-03T13:24:25+5:302018-08-03T13:26:27+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे पुर्व मतदार संघाचे आ.अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयावर दोन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे पुर्व मतदार संघाचे आ.अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयावर दोन तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. सरकारविरोधात आणि आ.सावे यांच्या विरोधात घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाने परिसर दणाणून सोडला. थाळी वाजवून महिला व कार्यकर्त्यांनी ठिय्या करीत घोषणा दिल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्यासह पदाधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले.
भाजपचे मराठा समाजाचे नगरसेवक आणि पदाधिकारी देखील ‘एक मराठा लाख मराठा’ च्या टोप्या घालून आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक शिवाजी दांडगे, रामेश्वर दसपुते, अशोक काळे, अर्जुन गवारेंची यावेळी उपस्थिती होती. मराठा क्रांती मोर्चाचे संतोष काळे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले, वारंवार सरकाराला निवेदन दिले. समाजातील १३ बांधवांनी आरक्षण व इतर मागण्यांसाठी बलिदान दिले. आ.सावे यांनी समाजाच्या मागण्या विधीमंडळात मांडून समाजाला आरक्षण देण्याची आग्रही भूमिका मांडली पाहिजे.
आंदोलनात शैलेश भिसे, किशोर चव्हाण, रवींद्र काळे, सुनील कोटकर, ईश्वर चव्हाण, रमेश गायकवाड, राजाराम मोरे, सुनील देशमुख, मुकेश सोनवणे, सचिन मिसाळ, अमोल जाधव, अशोक वाघ, संजय सोमवंशी आदींसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होता. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भारत काकडे यांच्यासह पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी आंदोलनस्थळी प्रचंड बंदोबस्त लावला होता.