मराठा क्रांती मोर्चाचा ९ ऑगस्टपासून शासनाविरोधात एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:47 PM2019-07-31T17:47:27+5:302019-07-31T18:31:00+5:30
क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर आंदोलन
औरंगाबाद: कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावीत आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्या ८ ऑगस्टपर्यंत न सोडविल्यास ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रविंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक औरंगाबादेतील यशवंत कला महाविद्यालयात बुधवारी दिवसभर पार पडली.बैठकीच्या सुरवातीला उपस्थित मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर करणार नाही, अशी सामुहिक शपथ घेतली. यानंतर दिवसभर विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहेत. या अपीलावर आपले म्हणणे मांडण्यासाठी शासनाने अद्यापही वकिल नेमला नाही. यामुळे आरोपींच्या या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. परिणामी आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबली आहे.
मराठा समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शासनाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमली आहे. ही समिती कोणतेही काम करीत नाही. मराठा आरक्षण आंदोलनावर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्याने समाजातील ४३ तरूणांनी आत्मबलिदान दिले. यामुळे संतप्त बांधवांनी हिसंक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात दाखल झालेली गुन्हे सरसरकट मागे घ्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याबाबत निर्णय घेतला जात नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला वाढीव निधी द्यावा आणि अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते झाला.
८ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ पासून राज्यभर गणिमी कावा पद्धतीने ठिय्या आंदोलन केले जाईल. तसेच १५ ऑगस्टपासून राज्यभर सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती रविंद्र काळे पाटील यांनी दिली. यावेळी किशोर चव्हाण, सुनील कोटकर,सचिन मिसाळ, संजय सावंत, अशोक मोरे,दिलीप झगरे,विशाल पवार, मुकेश सोनवणे, रघूनाथ खेडेकर,दिगंबर गायके, योगेश शेळके, निलेश ढवळे, कल्याण शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड,अनुराधा ठोंबरे आदींची उपस्थिती होती.